गेल्यावेळी मला पडलेली सर्व मतं नारायण आबांच्या पारड्यात टाकली असती तर ते आमदार झाले असते – अतुल खूपसे
करमाळा (दि.१५) – गेल्यावेळी मला पडलेली सर्व मतं नारायण आबांच्या पारड्यात टाकली असती तर ते आमदार झाले असते, त्यामुळे यंदा देखील ही दुफळी आणि मतविभागणी टाळण्यासाठी मी नारायण आबांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याच्या अटीवर पाठींबा जाहीर केला असल्याची माहिती जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे यांनी संदेश न्यूजला बोलताना दिली.
सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या करमाळा विधानसभा निवडणुकीत चांगलाच रंग भरला असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार नारायण पाटील यांना चर्चेतील आणि चळवळीतील नेते जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी अखेरच्या क्षणी पाठिंबा मिळाल्यामुळे करमाळा विधानसभा मतदारसंघात तुतारीचे पारडे जड झाले आहे.
अतुल खूपसे-पाटील यांचं करमाळा तालुक्यासह मतदारसंघात आणि जिल्ह्यात शेतकरी संघटनेचे मोठं जाळं आहे. खासकरून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आक्रमक भूमिका घेत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांचा कडवा विरोधक अशी अतुल खुपसे यांची तालुक्यासह जिल्ह्यात ओळख आहे. शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणाच्या नोटीसी आल्यानंतर त्यांनी संजयमामा शिंदे यांच्या विरोधात अनोख्या स्टाईलने आंदोलन केले होते.
गतवेळेस झालेल्या विधानसभा निवडणुकीत खुपसे-पाटील यांनी वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी लढवली होती आणि याच निवडणुकीत नारायण पाटील यांचा थोड्या थोडक्या मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे यंदाची मतविभागणी टाळण्यासाठी अपक्ष उमेदवारी लढविण्याच्या तयारीत असलेले अतुल खुपसे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेऊन आठवडाभर गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांची चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार नारायण पाटील यांना पाठींबा दिला आहे.
२०१९ च्या निवडणुकीला संजय मामा शिंदे यांना ७८,८२२ इतकी मते पडली होती तर नारायण पाटील यांना ७३,३२८ इतकी मते मिळाली होती. संजयमामा शिंदे यांचा त्या निवडणुकीत अवघा ५४९४ मतांनी विजय झाला होता. अतुल खूपसे यांना ४४६८ मते मिळाली होती.
करमाळा तालुक्यातील ११८ गावांचा आणि माढा तालुक्यातील ३६ गावांचा या ५ वर्षात विकास नव्हे तर भकास केला आहे. नारायण आबांना निवडून आणण्यासाठी जनशक्तीचे कार्यकर्ते उमेदीने काम करणार.
- अतुल खूपसे-पाटील