केम प्राथमिक आरोग्य केंद्रास कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक न केल्यास आरोग्य केंद्रास टाळे ठोकु – वर्षाताई चव्हाण
केम (संजय जाधव) – केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास येत्या दहा दिवसांच्या आत जर कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक न केल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रास टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीच्या तालुका प्रमुख सौ वर्षांताई चव्हाण यांनी दिला.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केम प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण १९ गावे जोडली आहेत. तसेच या आरोग्य केंद्रात एकूण चार उपकेंद्र आहेत या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी यांची मंजूर पदे सध्या ही दोन्ही पदे रिक्त आहेत. एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याने गोर,गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. सध्या या प्राथमिक आरोग्य केंद्रातील समुदाय अधिकारी बागडे हे आपल्या माणूसकीतून रूग्णांची सेवा करीत आहे. त्यांच्या कडे निंभोरे उपकेंद्रे आहे. त्यांना बाहेर गावाला जावे लागते, अशा वेळेस केम प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या गोर,गरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यांना औषध गोळ्या द्यायला सुध्दा कुणी उपलब्ध नसते. खाजगी दवाखान्यात जास्त पैसे जातील या भीतीने ते दवाखान्यात जायचे टाळून आजार अंगावर काढतात. शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करून गोर गरीबाची सेवा करण्यासाठी हाॅस्पिटल बांधली आहेत परंतु ग्रामीण भागात डाॅ चार्ज घेत नाहीत अशी या आरोग्य केंद्राची परिस्थिती आहे .
या आरोग्य केंद्रात एकूण सर्व पोस्टची दहा जागा रिक्त आहेत. या जागा शासन कधी भरणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. पुन्हा राज्यात कोराना वाढत आहे. राज्यात हाय अलर्ट लागू केला आहे. आरोग्य मंत्री तर सांगत आहे सर्व यंत्रणा सज्ज आहे . हे फक्त सांगायचे परंतु ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राची पार्श्वभूमी पाहिली तर डॉक्टर नाही मग साथींच्या रोगाला कसा आळा घालणार ही गंभीर परिस्थिती आहे तरी लवकरात लवकर एम,बी,बी,,एस डाॅ ची नेमणूक करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.