केम | उमेदवारांचा होम-टू-होम प्रचार - प्रचारात महिलांचा मोठा सहभाग - Saptahik Sandesh

केम | उमेदवारांचा होम-टू-होम प्रचार – प्रचारात महिलांचा मोठा सहभाग

फोटो | सरपंच पदाचे उमेदवार १) मनीषा देवकर २) सारिका कोरे | पॅनल प्रमुख – ३) अच्युत तळेकर ४) अजित तळेकर

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसंभो ग्रामविकास पॅनल (मोहिते-पाटील गट) व श्री ऊत्तरेश्वर परिवर्तन पॅनलचा अशा दोन गटात चुरशीची निवडणूक होत असून दोन्ही गटाने होम टू होम प्रचार सुरू केला आहे. सरपंच पद हे ओ.बी.सी. महिला राखीव असल्याने या प्रचारात महिला मोठ्या प्रमाणावर उतरल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत रंगत येणार आहे.

दरम्यान प्रचारासाठी लाऊडस्पिकरच्या गाडया आहेत. सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार सुरू असून संपूर्ण वातावरण तापले आहे. नुकतीच प्रचाराची पहिली फेरी संपली आहे. केम गावचे मतदार वाड्या वस्त्या वर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या वस्यावर उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. दररोज सकाळी-संध्याकाळी उमेदवार प्रचार करण्यासाठी वाड्या वस्त्या गाठत आहेत कारण या वस्त्यांवरील मतदार शेतात काम करायला जातात. संध्याकाळी हे मतदार वस्तीवर सापडतात. वस्ती वरील मतदार कंटाळून गेले आहेत. एका पॅनेलची गाडी जाती नाही तो वर दुसऱ्या गटाची गाडी येत आहे.

सरपंच पद हे जनतेतून निवडले जाणार आहे. सध्या दोन्ही गटाने सरपंच आमचा होणार असा दावा केला आहे मतदार मात्र शांत आहेत. मतदार दोन्ही गटाला “आम्ही तुम्हालाच मतदान करू” असे सांगतात त्यामुळे मतदार या निवडणुकीत कोणाला कौल देणार हे मतदान झाल्यावरच कळणार आहे.

शिवसंभो ग्रामविकास पॅनल मोहिते-पाटील गटाचे सरपंच पदाचे उमेदवार सौ सारिका कोरे तर श्री ऊत्तरेश्वर परिवर्तन पॅनलचा सौ मनिषा देवकर या उमेदवार आहेत दोन्ही गटाने मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी सुरू केल्या आहेत. शिवसंभो ग्रामविकास पॅनल (मोहिते-पाटील गट) १५ वर्षात केलेल्या कामावर मत मागतात, तर श्री ऊत्तरेश्वर परिवर्तन पॅनल गेल्या १५ वर्षात रखडलेल्या विकासाचा पाढा सांगतात. सध्या प्रचारासाठी श्री ऊत्तरेश्वर परिवर्तन पॅनल कडे मनुष्य बळ जास्त दिसत आहे, तर शिवसंभो ग्रामविकास पॅनल कडे मोजके कार्यकर्ते गनिमी काव्याप्रमाणे आपली प्रचार यंत्रणा जास्त गवगवा न करता संभाळत आहेत. आता मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात हे सहा तारखेला कळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!