ठाकरे गटाची निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करत राहणार – वर्षाताई चव्हाण
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याची परिस्थिती अतिशय निंदनीय आहे. भल्या, भल्या, राजकीय मंडळीनी स्वार्थासाठी पक्षाशी बेइमानी केली आहे. असे असले तरी आपण उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची माहिती शिवसेनेच्या करमाळा तालुका महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण यांनी दिली.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सध्या स्वार्थाचे राजकारण लोक करत असून त्यांना शेतकऱ्यांचे,सामान्य जनतेचे काही देणे घेणे नाही. शिवसेनेची सत्ता असताना मला तालुक्यातील स्वार्थी राजकिय नेत्यांनी तालुका प्रमुख पदावरून दूर केले. पण मी पक्षाशी गद्दारी केली नाही. मी निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम केले. आपण लग्नाच्या अगोदर पासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सैनिक आहे. समाजातील गोरगरीब जनता व तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी मेहनत घेतली आहे व जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविला आहे. त्यामुळेच आज माझी ठाकरे गटाने पुन्हा एकदा तालुका प्रमुख पदी निवड केली आहे या निवडीचे मी सोने करून दाखवेन.
करमाळा तालुक्यात शिवसेना महिला आघाडीचे सदस्या वाढविण्याचा प्रयत्न करणार. मला एकनाथ शिंदे शिवसेना गटाची ऑफर आली होती परंतु आपण याला बळी पडलो नाही. मी हिंदू हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांचे एक निष्ठ पाईक आहे. सत्ता असो नसो आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.