MIDC चे प्रश्न सोडवून करमाळ्यासाठी मोठे उद्योग आणू – उद्योगमंत्री उदय सामंत
करमाळा (दि.११) – करमाळ्याच्या एमआयडीसीचे सर्व प्रश्न सोडवून औद्योगिक विकासासाठी मोठे उद्योग आणू असे आश्वासन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी करमाळा येथील सभेमध्ये केले. महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांच्या प्रचारार्थ करमाळा येथे आज (दि.११) ही सभा आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल, विलासराव घुमरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे , मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या प्रियांका गायकवाड, दादासाहेब तनपुरे, रमेश कांबळे तसेच महायुती घटक पक्षाचे अन्य पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याआधी महाराष्ट्र उद्योगांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही सर्वांनी उद्योग वाढीसाठी काम केले व देशात सर्वात चांगले उद्योग महाराष्ट्रात येत आहेत. रत्नागिरी जिल्हा हा उद्योग विकासामध्ये फार मागासलेला होता; परंतु एका वर्षात जवळपास आम्ही तीस हजार कोटी रुपये चे उद्योग तेथे आणलेले आहेत.
महाराष्ट्रामध्ये खूप चांगले उद्योग येत आहे त्यातील काही उद्योग करमाळा मध्ये आम्ही आणू. करमाळ्याच्या एमआयडीसी मध्ये फार मोठे साईजचे प्लॉट असल्याने उद्योजक असे प्लॉट घेण्यास तयार नसल्याचे महेश चिवटे यांनी सांगितले यावर आपण हे प्लॉट छोटे करून उद्योजकांना उपलब्ध करून देऊ असे ते म्हणाले. करमाळा येथे औद्योगिक विकास व्हावा, मोठे उद्योग करमाळ्यात उभे रहावेत यासाठी करमाळा-माढा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार दिग्विजय दिगंबराव बागल यांना विजयी करण्यासाठी व विधानसभेत जाण्यासाठी साथ द्यावी असे आवाहन मा.सामंत यांनी केले.
महिलांना आवाहन करताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार जर निवडून आले तर ते महिलांविषयी ज्या वेगवेगळ्या उपयुक्त योजना महायुती सरकारने आणलेल्या आहेत ते त्या बंद करणार आहेत. याबाबत महाविकास आघाडीचे नागपूरचे आमदार सुनील केदार यांनी देखील वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे तुम्ही या योजना सुरू ठेवण्यासाठी महायुतीलाच मतदान करावे.
विविध गटाच्या कार्यकर्त्यांनी बागल गटांमध्ये प्रवेश केला
देलवडी येथील शिंदे गटातून समाधान ढवळे, दादा तावरे, अमोल ढवळे, तुषार ढवळे, सागर ढवळे,अर्जुन काळे पोपट ढवळे, राजेंद्र पांडव, सुनील टकले, सचिन तावरे आदी जणांनी शेलगाव(क) येथून नारायण पाटील गटातुन श्रीधर गणपत पाटील, हनुमंत कोंडीबा वीर, पोपट पायघन, भीमराव नामदेव बनसोडे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते यांनी बागल गटात प्रवेश केला आहे. सावडी येथून शिंदे गटातून ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब विठ्ठल जाधव, लालासाहेब विठ्ठल जाधव यांनी तर करमाळा येथील माजी नगरसेवक अतुल फंड यांनी देखील बागल गटात प्रवेश केला आहे.