करमाळ्याचे सुपुत्र व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन -

करमाळ्याचे सुपुत्र व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री व करमाळ्याचे सुपुत्र मदनदास देवी (वय ८१ ) यांचे काल (ता. २४ ) पहाटे बंगळुरू येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. २५ ) सकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संग्रहित छायाचित्र – पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत मदनदास देवी

करमाळा येथील खुशालदास देवी यांचे ते लहान बंधू होते तर राधेश्याम देवी यांचे ते चुलते होते. स्व.मदनदास देवी यांचा जन्म ९ जुलै १९४२ या दिवशी करमाळा (जि. सोलापूर) येथे झाला. शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी पुण्यातील बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) त्यांनी १९५९ मध्ये प्रवेश घेतला. एम.कॉम नंतर आयएलएस लॉ कॉलेजमध्ये सुवर्णपदकासह एलएलबीची परीक्षा उत्तीर्ण झाले. राष्ट्रीय स्तरावर रँक मिळवत त्यांनी सनदी लेखापाल (सी. ए.) परीक्षा उत्तीर्ण झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदनदास देवी यांच्या निधनानंतर ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली.

पुण्यात शिक्षण घेत असतानाच मोठे बंधू खुशालदास देवी यांच्या प्रेरणेने मदनदास देवी यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. त्यांनी आपले आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यासाठी वाहून घेतले होते. आयुष्यातील जवळपास ७० वर्षे त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले. एका शाखेतील स्वयंसेवकापासून ते सह सरकार्यवाह असा त्यांचा प्रवास झाला. १९६९ पासून संघ प्रचारक होते.

अभाविपमध्ये त्यांनी १९७५ पासून कामास सुरूवात केली. तेथे ते विभाग, प्रदेश व क्षेत्रीय अशा जबाबदाऱ्यांनंतर त्यांनी अ.भा. संघटन मंत्री म्हणूनही काम केले. महाविद्यालय- शहर पातळीवर संस्कारित कार्यकर्ता समूह उभा राहील यासाठी विशेष लक्ष देत त्यांनी संघटनकार्याचा पाया रचला. अनेक समर्पित कार्यकर्त्यांच्या पिढ्या त्यांनी घडविल्या. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठीत झालेले संघाचे सरकार्यवाह एच.दत्तात्रय, सुशील मोदी, शिवराजसिंह चौहान, विनोद तावडे , चंद्रकांत पाटील व दिवंगत प्रमोद महाजन , अरुण जेटली , एच.एन. अनंतकुमार यांच्या सारखे अनेक कार्यकर्ते मदन दास यांच्या तालमीत घडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे समवेत
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केले.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच होते. अखेर काल त्यांची आजारपणामुळे प्राण ज्योत मालवली. आज(दि.२५) मंगळवारी सकाळी ९  वाजल्यापासून ते ११ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव  मोतीबागेत अंत्यदर्शनासाठी  ठेवण्यात येणार आहे.  त्यानंतर सकाळी ११.३० वाजता  वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पूर्ण ट्विट : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के वरिष्ठ प्रचारक आदरणीय मदनदास देवी जी के निधन का समाचार सुनकर अतीव दुःख हुआ। मेरे छात्र जीवन से मुझे मदनदास जी के साथ काम करने का, उनसे संघटन कौशल सिखने का अवसर मिला‌। चार्टर्ड अकाउंटेंट में गोल्ड मेडल प्राप्त करने के बाद भी देश और समाज के लिए खुद को समर्पित करते हुए उन्होंने संघ के प्रचारक के तौर पर अपना कार्य शुरु किया। विद्यार्थी परिषद के माध्यम से देश के करोड़ो युवाओं को उन्होंने प्रेरित किया। उनके निधन से देश ने एक युगपुरुष को खोया है। मदनदास जी का कार्य, उनके संस्कार मुझ जैसे करोड़ों कार्यकर्ताओं को सदैव प्रेरणा देते रहेंगे। ईश्वर दिवंगत आत्मा को शांति प्रदान करें। ॐ शांति

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मोठे नेते उद्या स्व. मदनदास देवी यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थित राहणार असल्याचे समजले. करमाळा तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व भाजपचे कार्यकर्ते या अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करून दुःख व्यक्त केले.

करमाळ्यातील भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, भाजपा व्यापार आघाडी शहराध्यक्ष जितेश कटारिया, भाजपचे करमाळा तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके आदींनी सोशल मीडियावर वर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

संपादन – सूरज हिरडे

स्व. मदनदास देवी यांच्या करमाळा येथील फोटो स्वरुपातील काही आठवणी :

करमाळा येथील द.शि.गायकवाड (दादा) यांना मदनदास देवी यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार करमाळा येथे देण्यात आला होता.
करमाळा येथील कार्यक्रमातील फोटो
कुटुंबासमवेत करमाळा येथे २६ डिसेंबर २०१३ रोजी काढलेला फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!