माढयाचा तिढा! - Saptahik Sandesh

माढयाचा तिढा!

माढा लोकसभा मतदार संघाची निर्मिती सन २००८ साली झाली. माढा, करमाळा,माळशिरस, सांगोला व सातारा जिल्ह्यातील फलटण व माण या सहा तालुक्यांचा मतदार संघ
आहे. मतदार संघाची निर्मिती झाली व त्याचा आरंभ राष्ट्रवादीचे संस्थापक व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या विजयाने झाला होता. या निवडणुकीत शरद पवार यांच्या विरुध्द भाजपाचे सुभाषबापू देशमुख उभे होते, तसेच रासपाचे महादेव जानकर हे ही उभे होते. त्यावेळी
पवार यांना ५,३०, ५९६ मते मिळाली तर देशमुख यांना २,१६,१३७ तर जानकर यांना ९८९४६ मते मिळाली. त्यावेळी पवार हे तब्बल ३,१४,४५९ मताच्या फरकांनी विजयी झाले होते.

त्यानंतर सन २०१४ च्या निवडणुकीत पवारांचे वारसदार कोण..? हा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी मोहिते-पाटील यांनी आपले पुत्र रणजितसिंह मोहिते- पाटील यांना उमेदवारी द्या; अशी मागणी केली पण श्रेष्ठीने ते मान्य केले नाही. सन २०१४ च्या निवडणुकीत मोहिते-पाटील यांच्या विरुध्द महायुतीचे उमेदवार स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत तसेच कै. प्रतापसिंह मोहिते-पाटील हे ही उभे होते. यावेळी मोहिते-पाटील
अवघ्या २५,३४४ मतांनी विजयी झाले. त्यावेळी त्यांना ४,८९,९८९ मते मिळाली तर खोत यांना ४,६४,६४५ मते मिळाली तर प्रतापसिंह यांना २५१८७ मते मिळाली होती. थोडक्यात मोदी लाटेत मोहिते-पाटील हे निसटत्या मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर सन २०१९ च्या निवडणूकीत भाजपाने स्वतःचा उमेदवार उभा केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला दणका देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेनवारी दिली. त्यावेळी राष्ट्रवादीकडून संजयमामा शिंदे यांना उभे केले होते. त्यावेळी मोदी लाटेचा फायदा नाईक निंबाळकर यांना मिळाला. ते ८५७६४ मतांनी विजयी झाले. नाईकनिंबाळकर यांना ५,८६,३१४ ता शिंदे यांना ५,००,५५० मते मिळाली.

यावेळी पुन्हा भाजपाने विद्यमान खासदार नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. खा. नाईक निंबाळकर व मोहिते-पाटील परिवारात गेल्या अनेक दिवसापासून मतभेद असल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभुमीवर यावेळी नाईक निंबाळकर यांच्या ऐवजी धैर्यशिल मोहिते-पाटील यांना भाजपाने उमेदवारी द्यावी यासाठी मोहिते-पाटील परिवाराने खुप प्रयत्न केले होते पण त्यात यश आले नाही. त्यामुळे पक्षांतर करून थोडक्यात राष्ट्रवादीच्या तुतारीवर निवडणूक लढवावी यासाठी मोहिते समर्थक प्रयत्नशील आहेत. तसंतर सोलापूर जिल्हा हा मोहिते-पाटील यांचा बालेकिल्ला होता. मोहित पाटील बोले व जिल्हा डोले असे पुर्वी चित्र होते. याला काही प्रमाणात अक्कलकोट, दक्षिण व उत्तर सोलापूर आणि शहराचा काही अपवाद होता. पुर्वी जिल्ह्यातील राजकारणाचा निर्णय अगोदर अकलूजला व्हायचा मग जिल्ह्यात जाहीर व्हायचा. अकलूजकरांनी सांगितलेला शब्द अंतीम होता. ते म्हणतील तोच नेता, तोच उमेदवार,
तोच कारखान्याचा चेअरमन, तोच दुध संघाचा संचालक / चेअरमन, जिल्हा बँकेचा संचालक/चेअरमन, जिल्हा परिषदेचा सदस्य / अध्यक्ष, एवढेच नाहीतर तालुक्यातील पंचायत समितीचा सभापती व उपसभापतीची चिठ्ठी अकलूजवरून येत असे. हे सुत्र सुर्रास सुरू होते.
त्यामुळे कुवत नसलेली पण निष्ठा असलेली माणसं तर काही चमचेगिरी करणारी माणसं पुढे आली. संत तुकाराम महाराज म्हणतात तसे ‘थोराघरच्या श्वानालाही सन्मान’ तसे झाले होते.
त्यांच्याकडच्या सेवकांनेही आमदार-सभापतीला झापावे व इतरांनी ऐकावे असे चित्र झाले होते. या परिवारातील २० वर्षाच्या मुलाच्या पायावर ५० वर्षाच्या पुढाऱ्याने जनमाणसात डोके ठेवावे; अशी अनिष्ठ प्रथा सुरू झाली होती. या व अन्य सर्वच बाबीचा अतिरेक झाला होता. 

याबाबीला करमाळेकरांनी पहिला सुरूंग लावला. आदिनाथच्या निवडणूकीत कै. प्रतापसिंह मोहित पाटील यांनी कडक भुमीका घेतली. त्यांनी बागल गटाला शह देण्यासाठी जगताप गट, नारायण पाटील गट यांच्याबरोबर युती करून स्वतःच्या नेतृत्वाखाली आदिनाथची निवडणूक लढवली. सर्वशक्ती पणाला लावली, अकलूज व जिल्ह्यातील मोहिते-पाटील गटाचे कार्यकर्ते, पाहुणे-रावळे प्रचाराला बोलावले होते पण करमाळा तालुक्यातील स्वाभिमानी जनतेने मोहिते-पाटील यांना अस्मान दाखवले. त्यावेळी मोहिते-पाटील यांचे भरकटलेले विमान जमीनीवर आले. त्यानंतर मोहिते-पाटील गटाचे जिल्ह्यातील प्रस्थ कमी होऊ लागले. सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री म्हणून असलेले दादा गटातटाच्या राजकारणाचे बळी ठरले आणि पंढरपूर विधानसभा मतदार संघातून भारत भालके यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच तालुके मोहिते-पाटील यांच्या दबावातुन मुक्त झाले. दरम्यान माढा, बार्शी, मोहोळ या मंडळीनी आपापल्या तालुक्यात पाणी आणले, साखर कारखाने उभारले, स्थानिक प्रगती करून तालुक्यात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. त्यामुळे मोहिते-पाटील यांचे जिल्हा दुध संघ, जिल्हा परिषद, जिल्हा बँक या संस्थावरील बऱ्यापैकी वर्चस्व कमी झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनीही मोहिते-पाटील यांचेकडे दुर्लक्ष केले म्हणण्यापेक्षा त्यांची मोनोपॉली संपवण्यासाठी प्रयत्न केले. अन्य नेत्यांना पुढे येण्यासाठी सर्वार्थाने मदत केली. त्यामुळे ज्या घरात एकाचवेळी मंत्री, खासदार, आमदार, सभापती, जिल्हा परिषदेतील महत्वाची पदे होती, अशा घरात एकही मानाचे पद नव्हते. असे असुनही त्यांना वरीष्ठाकडून हात मिळत नव्हता. त्यामुळे एक वेळ तर अशी आली होती, की आता मोहिते-पाटील पक्ष बदलणार असे बोलले जात होते. मोहिते-पाटील समर्थक खुपच अस्वस्थ होते पण तसे काही झाले नाही. त्यानंतर उशीरानेच विजयदांदाना पक्षाने विधानपरिषदेत घेतले. या सर्व कठीण प्रसंगातही विजयदादा अत्यंत सयंमशीलपणे वागले. एवढ्या घडामोडी होत असताना त्यांनी थोडीही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मुळातच दादांचा स्वभाव शांत व संयमी आहे. दादांची सुरवात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून झाली, त्यानंतर आमदार, उपमंत्री व त्यानंतर मंत्री म्हणून ते कार्यरत होते. उपमंत्र्यापासून ते उपमुख्यंमत्र्यापर्यंत त्यांचा प्रवास झाला. या प्रवासात त्यांच्या वागण्यातील, बोलण्यातील मृदुता कधीही कमी झाली नाही. मोठी माणसं खरंच कशी मोठी असतात हे दादाकडूनच समजते. अशा दादांना निकटवर्तीयांच्या चुकीच्या वागण्याचा फटका बसला आणि पंढरपूर मतदार संघात हार पत्कारावी लागली. माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्यासारखे त्यांचे झाले होते. पण कै. देशमुख यांनी धीर सोडला नव्हता, ते जोमाने काम करत होते, नंतरच्या निवडणुकीत ते निवडून तर आलेच पण राज्याचे मुख्यमंत्री झाले. दादांच्या दृष्टीने तर वेगळीबाब आहे, कारण दादा हे बाहेरच्या मतदारसंघात जावून पराभूत झाले. दादांच्या आजपर्यंतच्या प्रवासात त्यांनी जोडलेली अनेक माणसं आहेत. पवार परिवाराकडून होत असलेली
हेळसांड पाहून आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपाने त्यांना विधानपरिषदेवर घेतले. मोहिते-पाटील गटाला भाजपाने एवढेच पद दिले जे समर्थन अपेक्षीत होते तसे समर्थन मिळाले नाही. या निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी त्यांना पाहिजे होती पण ती मिळाली नाही.

माढा लोकसभा मतदार संघाची निर्मिती झाली आणि सुरवातही शरद पवार यांच्या सारख्या दिग्गज माणसाच्या प्रतिनिधीत्वाने झाली ही विशेष बाब होती. श्री. पवार यांनी
बारामतीला कॅलीफोर्निया बनवले आहे. शेती, औद्योगिकरण, शिक्षण, समाजकारण सर्व क्षेत्रात चौफेर प्रगती केली आहे. त्यामुळे हे नेतृत्व माढा मतदार संघात नक्कीच क्रांती करेल अशी अपेक्षा येथील मतदारांना होती. तसे आश्वासन प्रचार सभेत बहुतेकांनी दिलेले होते. दुर्दैवाने ना. पवार हे
केंद्राच्या राजकारणात व कृषीमंत्री म्हणून पाच वर्ष व्यस्त होते. रूपयाचे मुल्य घटत असताना, मंदीच्या काळातही त्यांनी कृषी खाते पुढे आणले. शेती उत्पादन वाढले, निर्यात वाढली, साखर कारखानदारीला बळ दिले. केंद्रीय मंत्रीमंडळात सर्वात मोठे काम कृषीखात्याचे ठरले पण त्यांनी
माढा मतदार संघासाठी पाहिजे तसा प्रयत्न केला नाही किंवा तसा त्यांना वेळ मिळाला नाही. थोडाफार प्रयत्न केला पण तो नाममात्र नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या व प्रयत्न जुजबी, कोणाचेच समाधान झाले नाही. एकही मोठा उद्योग उभा राहिला नाही, रेंगाळलेले प्रकल्प परिपुर्ण झाले नाहीत, विकासाला चालना मिळाली नाही. वीज, पाणी, रस्ते हे मुलभुत प्रश्नही सुटले नाहीत. ना.पवार यांना जमले नसेल पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून कोणीतरी येथील विकास करण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे; तसा कोणी घेतला नाही. राज्य सरकार त्यांचे असुनही राज्यशासनाने
पवार साहेबाचा मतदार संघ म्हणून विशेष लक्ष दिले नाही. त्यामुळे येथील मतदार नाराज होता. त्यानंतरही मोहिते-पाटील यांना या मतदारसंघातून संधी मिळाली होती पण त्यांच्याही काळात माढा लोकसभा मतदार संघात विकासाचे वारे वाहिले नाही. त्यामुळे मतदारांनी भाकरी फिरवली व भाजपाला संधी दिली.

विद्यमान खासदार यांनी शेवटच्या टप्प्यात मतदारसंघाकडे लक्ष दिले पण ठोस कामांची मोठी यादी नाही. त्यामुळे मतदारसंघात त्यांचे स्वागत थंडेच आहेत पण सध्या भाजपातील इनकमींग व राज्य सरकार मधील पदाधिकाऱ्यांचे असलेले पाठबळ. यामुळे वर वर तर नाईकनिंबाळकरांना करमाळा तालुक्यातून विरोध दिसत नाही. पण मतदारांच्या मनात नेमके काय हे नंतर कळणार आहे. त्यामुळे यावेळी पुन्हा एकदा मोहिते-पाटील परिवारांनी रणांगणात उडी घ्यावी; असे मोहिते-पाटील समर्थकांची अपेक्षा आहे. सध्यातरी जर तर चे गणीत आहे. समर्थकांची
अपेक्षा आहे पण मोहिते-पाटील भाजपाच्या विरुध्द जाण्याचे धाडस करतील का ? हा महत्वाचा प्रश्न आहे. काही आश्वासनावर ते गप्प बसलेतर समर्थक बिच्चारे काय करणार..? एकंदरीत यावेळी विरोधकाकडून धैर्यशील मोहिते-पाटील, रासपाचे महादेव जानकर, अभयसिंह जगताप,संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ.अनिकेत देशमुख की आणखी कोण हे कोडे लवकरच सुटेल व माढ्याचा तिढा त्यावेळी सुटेल !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!