मकाई निवडणूक - बागल गटाने अर्धी बाजी मारली-नऊ ठिकाणी बिनविरोधचा मार्ग मोकळा - Saptahik Sandesh

मकाई निवडणूक – बागल गटाने अर्धी बाजी मारली-नऊ ठिकाणी बिनविरोधचा मार्ग मोकळा

करमाळा/संदेश विशेष प्रतिनिधी

करमाळा : मकाई निवडणूकीत छाननीच्या निकालानंतर बागलगटाने अर्धी बाजी मारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. चिखलठाण ऊस उत्पादक मतदार संघातील-दोन, पारेवाडी मतदार संघातील-तीन, सहकार संस्था मतदार संघातील – एक, इतर मागासवर्गीय मतदार संघातील – एक, अनुसुचितजाती जमाती मतदार संघातील – एक, भटक्या विमुक्त मतदार संघातील – एक अशा नऊ जागा बागल गटाने आजच खिश्यात घातलेल्या आहेत.

मकाई कारखाना निवडणूक ही सहज व सोपी होणार हे गणीत बागल गटाने ठरवून वाटचाल केली होती. त्यामुळे त्यांनी फार गांभिर्याने पाहिले नव्हते. याचे कारण म्हणजे उमेदवारी अर्जासाठी सलग तीन वर्षे ऊस घालण्याची अट. दरम्यान ऐनवेळी प्रा. रामदास झोळ व पश्चिम भागातील नेत्या सवितादेवी राजेभोसले यांनी या निवडणुकीत उडी घेतली. त्यामुळे या निवडणुकीकडे संपुर्ण तालुक्याचे तसेच जिल्ह्याचेही लक्ष वेधले होते.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जागेसाठी ७५ अर्ज दाखल झाले होते.१९ तारखेच्या झालेल्या ७५ पैकी ३५ अर्जावार दोन्ही गटांनी एकमेकावर आक्षेप घेतले होते. त्यामध्ये सुनावणी होवून त्याचा निकाल आज (ता.२२) दिला. त्यात हरकतीसह एकूण ३७ अर्ज नामंजूर झाले. जे अर्ज नियमात बसत नव्हते असे अर्जसुध्दा निवडणूक अधिकारी सोपान टोंपे यांनी नामंजूर केले. त्यामुळे १७ जागेसाठी ३८ उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले आहेत. मंजूर अर्जावरून निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

यामध्ये सहकार मतदार संघात बागलगटाचे उमेदवार नवनाथ बागल यांचा एकमेव अर्ज असल्याने ते बिनविरोध विजयी घोषीत करण्याची औपचारीकता राहिलेली आहे. याशिवाय इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदार संघात अनिल अनारसे यांचा एकमेव अर्ज राहिलेला आहे. भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग मतदार संघात बागलगटाचे प्रतिनिधी बापू चोरमले व राजश्री चोरमले यांचे एकाच परिवारातील अर्ज राहिलेले आहेत, तिथे विरोधकाचा अर्ज नाही. त्यामुळे हा मतदार संघही बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याच प्रमाणे अनुसुचित जाती-जमाती मतदार संघातही बागलगटाचे आशीष गायकवाड व सुषमा गायकवाड यांचे एकाच परिवारातील अर्ज राहिलेले आहेत. तिथे विरोधकाचा अर्ज नाही. त्यामुळे हा मतदार संघही बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महिला मतदार संघात दोन जागेसाठी चार अर्ज आहेत. त्यामध्ये कोमल करगळ व अश्वीनी झोळ किंवा शांता झोळ असे बागल गटाचे दोन अर्ज आहेत. तिथे विरोधीगटाच्या सुनिता गिरंजे यांचा एकमेव अर्ज आहे. त्यांचा भिलारवाडी ऊस उत्पादक मतदार संघातही अर्ज आहे. जर त्यांनी महिला मतदार संघातील अर्ज काढला तर ही निवडणूक बिनविरोध होवू शकते किंवा तिथे निवडणूक लागू शकते.

मांगी मतदार संघात दोन जागेसाठी दिनेश भांडवलकर, रोहित भांडवलकर, अमोल यादव, रविंद्र लावंड, हरीश्चंद्र झिंजाडे व सुभाष शिंदे असे अर्ज मंजूर आहेत. त्यामध्ये श्री. शिंदे यांचा एकमेव विरोधी अर्ज आहे. अन्य अर्ज बागल समर्थकांचे अर्ज आहे. अन्य अर्ज बागल समर्थकांचे आहेत. शेवटच्या क्षणी त्यात काहीना काही तडजोड होवू शकते.

चिखलठाण ऊस उत्पादक मतदार संघात – दोन जागेसाठी तीन अर्ज मंजूर आहेत. त्यामध्ये सतिश निळ व त्यांचे नातेवाईक निर्मला इंगळे व दिनकर सरडे यांचे अर्ज आहेत. यात श्रीमती इंगळे या अर्ज काढून घेणार असल्याने या मतदार संघातील निवडणूक बिनविरोध होणारच आहे. त्याच प्रमाणे वांगी गटात दोन जागेसाठी पाच अर्ज आहेत. त्यात बागल गटाचे दोन अर्ज पुरक आहेत. त्यामध्ये सचिन पिसाळ व तुकाराम पिसाळ तसेच युवराज रोकडे व मनिषा दौंड यांचे अर्ज आहेत. यातील एक-एक अर्ज काढले जाणार आहेत.

विरोधकाकडून सध्या फक्त अमित केकान यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आहे. पारेवाडी मतदार संघात तीन जागेसाठी सात अर्ज आहेत. विशेष म्हणजे ते सर्वच्या सर्व बागल समर्थकाचे आहेत. त्यामध्ये गणेश चौधरी यांनी उमेदवारी न दिल्याने बागलगटावर नाराज होवून अर्ज भरलेला आहे. उर्वरीत अर्ज बाळासाहेब पांढरे/नितीन पांढरे, रेवन्नाथ निकत / हनुमंत निकत, तसेच संतोष पाटील / स्वाती पाटील. यात बागल गट श्री. चौधरी यांचे समाधान करून हा मतदारसंघ बिनविरोध करू शकतात. जिथे खरी लढत होवू शकतो तो भिलारवाडी ऊस उत्पादक मतदार संघ आहे. तिथे बागल समर्थकांनी उमेदवारी मिळत नाही म्हटल्यावर चक्क बागलगटाला सोडून माजी आमदार पाटील गटात प्रवेश केला आहे. त्यानुसार येथे बागलगटाकडून विद्यामान संचालक रामभाऊ हाके व अजित झांजुर्णे यांना दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना पुरक अर्ज संतोष झांजुर्णे व मंगल हाके हे आहेत. तर स्पर्ध्येत आप्पा जाधव, सुनिता गिरंजे,बाबुराव अंबोधरे यांचे अर्ज आहेत.

एकंदरीत सर्व मतदार संघाचा आढवा घेतला असता बागलगटाच्या नऊ जागा सहज बिनविरोध होत आहेत. उर्वरीत ठिकाणी म्हणजे वांगी, मांगी या मतदार संघातही एक-एक च उमेदवार या क्षणी आहे. त्यामुळे ते लढणार की नाही. यावर या मतदार संघाचे भवितव्य अवलंबून आहे. सध्यातरी बागलगटाने या निवडणूकीत कमांड मिळावली आहे. जे अर्ज नामंजूर झाले त्याबाबत अपीलात किती यश मिळेल हे सांगता येत नाही. यश मिळालेतरी काही मतदार संघात बागलगटाने पकड मिळवलेली आहे. सध्याच्या स्थितीत प्रा. झोळ व सौ. राजेभोसले यांच्याकडे नेतृत्व राहिलेले नाही व त्यांच्या नेतृत्वाविना अन्य उमेदवार ही निवडणूक कशी लढवणार ? हा खरा प्रश्न आहे. अशी निवडणूक लढवण्यासाठी किमान तीन वर्षे तयारी करावी लागते. अचानक विरोधासाठी विरोध करून निवडणूक लढवणे तसे अवघडच असते. सध्याचे प्रस्तापित राजकारणी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप हे तटस्थ आहेत तर माजी आमदार नारायण आबा पाटील हेसुध्दा तटस्थ आहेत पण जर प्रा. झोळ व सौ. राजेभोसले यांचे अपीलात अर्ज मंजूर झाले व विरोधकाचे प्रबळ उमेदवार दिसलेतर ते विरोधी गटाला पाठींबा देऊ शकतील खात्री नाही. एकंदरीत बागलगटाला अनंत अडचणी असल्यातरी सध्यातरी गटाची सत्ता आणण्यात ते यशस्वी होतील असेच चित्र झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!