आरपीआय पाठोपाठ मनसेने ही दिला संजयमामा शिंदे यांना जाहीर पाठिंबा
करमाळा (दि.१०) – करमाळा येथील नागेश कांबळे यांच्या आरपीआय पक्षाबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या विधानसभा निवडणुकीला विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
करमाळा तालुक्याच्या विकासासाठी आ.संजयमामा शिंदे हेच एकमेव पर्याय असल्यामुळे अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी दिली. करमाळा येथील केमिस्ट भवन येथे आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये त्यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला. यावेळी मनसे पक्षाचे सर्व पदाधिकारी मंडळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना संजय घोलप म्हणाले की करमाळा शहरात एमआयडीसीचा प्रश्न प्रलंबित आहे, करमाळा शहरातील पाण्याचा प्रश्न,स्वच्छतेचा प्रश्न सोडवायचा आहे. शेतकऱ्यांना वीज, पाणी, रस्ते उपलब्ध करुन द्यायचे आहेत. करमाळा तालुक्याच्या विकासासाठी आ.संजयमामा शिंदे हेच एकमेव पर्याय आहेत. म्हणून म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा द्यायचे ठरवले आहे.
करमाळा विधानसभा निवडणुकीमध्ये दिवसेंदिवस चुरस निर्माण झालेली असून सुरुवातीला बॅक फुटला गेलेला आ. संजयमामा शिंदे गट आता फ्रंट फुटला आलेला असून दिवसेंदिवस आमदार संजयमामा शिंदे गटाला विविध कार्यकर्त्यांसह पक्षांचा ,संघटनांचा पाठिंबा वाढू लागला आहे.
दि.8 नोव्हेंबर रोजी आर.पी.आयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नागेश कांबळे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन 2024 च्या करमाळा विधानसभा निवडणुकीत आपण दलित समाजाची संपूर्ण ताकद आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठीशी उभी करणार असल्याचे प्रतिपादन करून या निवडणुकीमध्ये दलित समाज किंगमेकरची भूमिका पार पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
यापूर्वीच जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य गणेशभाऊ चिवटे यांनीही आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. लवकरच ते मोठा मेळावा घेऊन पाठिंबा जाहीर करणार आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष ,वंचित बहुजन आघाडी हे सुद्धा पाठिंबा देण्याच्या विचारात आहेत. दिवसेंदिवस आमदार संजयमामा शिंदे यांच्या कॉर्नर सभा व जाहीर सभेमध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून त्यांचा वाढता पाठिंबा विरोधकांची डोकेदुखी ठरणार आहे.