ही निवडणूक विधानसभेची नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे – खासदार अमोल कोल्हे
करमाळा (दि.१९) – ही निवडणूक विधानसभेची निवडणूक राहिलेली नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांच्या प्रचारार्थ कुर्डूवाडी येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये व्यक्त केले. नारायण (आबा) पाटील यांना मत म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांना मत आहे असे समजून मतदान करा असे देखील आवाहन त्यांनी मतदारांना केले.
कुर्डुवाडी येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नारायण आबा पाटील यांच्या 244 करमाळा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. आपल्या भाषणात डॉ.कोल्हे यांनी संजयमामा शिंदे व बबनदादा शिंदे या दोघांवरही सडकून टीका केली. एकीकडे पवार साहेबांचे उंबरे झिजवायचे व दुसरीकडे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून अपक्ष लढायचे असे अविश्वासू दोन्ही बंधूंना पवार साहेबांच्या आदेशाचे पालन करत पराभूत करा असे आवाहनही केले.
छत्रपती संभाजी राजे यांना गद्दारी करून मारण्यात आले होते ही गद्दारी महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही अशाच प्रकारची गद्दारी करून उद्दव ठाकरे साहेबांच्या व पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, संकट काळात आधार द्यायचा सोडून विश्वासघात केला अशा दोन्ही शिंदे बंधूंना पराभूत करून दाखवून द्या की, करमाळा,माढा मतदारसंघातील जनता ही गद्दारांना माफी करत नाही.
घाबरू नका! धैर्यशील मोहिते पाटील तुमच्या पाठीशी
36 गावातील माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्याला इथे काम करताना धोका निर्माण झालेला आहे. असे वक्तव्य अतुल खूपसे यांनी आपल्या भाषणात केले होते. यावर बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की या छत्तीस गावातील कार्यकर्त्यांच्या पाठीशी हा धैर्यशील मोहिते पाटील आहे; कुणी तुम्हाला हात लावू द्या मी बघतो एकेकाला. कुणीही खोट्या केसेस होतील म्हणून पोलीस स्टेशनला घाबरायचं नाही. आपला ऊस या कारखान्यांना जाणार नाही याची भीती बाळगू नका अकलूजचा कारखाना आहे आदिनाथलाही सुरू करणार आहेत असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
कालच्या जाहीर सभेत शिवसेनेचे नेते हुजुर इनामदार यांनीही मुस्लिम बांधवांचे एकही मत भाजप व महायुतीचा छुपा पाठिंबा घेणाऱ्या शिंदेंना पडणार नाही असा विश्वास व्यक्त केला. खासदार डॉ.अमोल कोल्हे, हुजुर इनामदार व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भाषणाने करमाळा तालुक्यासह छत्तीस गावातील मतदारांमध्ये महाविकास आघाडीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रचार सभेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील, शेतकरी नेते अतुल खूपसे, घटनेकर पाटील, कुर्डूवाडीचे नेते दत्तात्रय गवळी, म्हैसगावचे सरपंच सतीश उबाळे यांची भाषणे झाली.
व्यासपीठावर माढा तालुक्याचे नेते बी. डी पाटील(बप्पा) यांचेसह माढा तालुक्यातील अनेक मोठे नेते उपस्थित होते. यावेळी उमेदवार नारायण आबा पाटील यांना मुस्लिम बांधवांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला.