दलितांना किंगमेकर बनविण्याची संधी – अपक्ष असल्याने संजयमामा शिंदेंना पाठिंबा – नागेश कांबळे
करमाळा (दि.८) – आम्ही कोणत्याही गटाचे काम करत नसून स्वतंत्रपणे दलितांच्या हक्कासाठी काम करत आहोत. आम्हाला महाविकास आघाडीकडे जायचं नव्हते कारण महाविकास आघाडी मधील काँग्रेसचे राहुल गांधी हे आरक्षण विरोधी असून आरक्षण समाप्ती करण्याच्या दृष्टीने काम करण्याची त्यांनी वाटचाल सुरू केली आहे. तर महायुतीमधील घटक पक्ष भाजप हा संविधानाला विरोध करणारा पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला दोन्हीही गटाला पाठिंबा द्यायचा नव्हता. संजय मामा शिंदे हे अपक्ष उमेदवार आहेत त्यामुळे नागेश कांबळे गटाने त्यांना पाठिंबा देण्याचे ठरविले आहे, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) नागेश कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की आमच्याबरोबर सुमारे दहा हजार दलितांची मते आहेत ही निर्णायक मते जर संजय मामा शिंदे यांना पळत असतील तर ते नक्कीच आमदार बनतील व त्यातून दलितांना किंगमेकर बनण्याची संधी आहे ही संधी दवडू नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे.
तुम्ही महायुती किंवा महाविकास आघाडी ला मत पाठिंबा न देण्याचे जर ठरविले आहे असे असले तरी संजयमामा शिंदे हे महायुतीच्या बाजूचे आहेत तर तुम्ही कसं काय पाठिंबा देत आहात असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर ते म्हणाले की संजयमामा शिंदे हे सध्या मविआ अथवा महायुती कडून लढत नाहीत, ते स्वतंत्रपणे अपक्ष लढत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत निवडून आल्यानंतर त्यांनी कोणत्या बाजूला जाणे हा त्यांचा प्रश्न आहे.
दलितांच्या अस्मिता जपण्यासाठी जे काम करतील अशा उमेदवारांना आम्ही पाठिंबा देत असतो संजयमामा शिंदे हे दलितांच्या हक्कासाठी काम करतील अशी अपेक्षा बाळगून आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. ज्या दिवशी दलितांच्या वर अत्याचार करण्यामध्ये संजय मामा शिंदे सुद्धा दिसून येतील त्या दिवशी संजय मामा शिंदे यांच्या विरोधात नागेश कांबळे दिसून येतील असा देखील इशारा त्यांनी यावेळी दिला.