बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळेस जी बंडखोरी झाली त्यात माझा काहीही हस्तक्षेप नव्हता – नारायण पाटील
करमाळा (दि.१०) – मागील बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळेस जी बंडखोरी झाली त्यामध्ये माझा कोणताही हस्तक्षेप नव्हता. आमच्यातीलच एक भांड होते ते निघून गेले, भाऊंना वाटले की हे आबांचे कारस्थान आहे. परंतु तालुक्याच्या राजकारणात तुम्ही मला आणलेल आहे हे लक्षात ठेवा. माझा स्वभाव, बापूंचा स्वभाव तुम्हाला माहित आहे. तालुक्याच्या राजकारणात तुमच्या बाबतीत मी एकही चूक केलेली नाही व भविष्यातही करणार नाही. असे वक्तव्य महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील यांनी कंदर येथील सभेमध्ये केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०१८ च्या निवडणुकीवेळी पाटील गट व जगताप गट यांची युती होती. 3 ऑक्टोबर 2018 रोजी सभापती निवडीवेळी नारायण पाटील गटाचे प्रा. शिवाजीराव बंडगर हे बंडखोरी करत बागल गटाकडे गेले होते. त्यामुळे सभापती पद हे जगताप गट ऐवजी बागल गटाकडे गेले. बागल गटाने सभापतीपद प्रा. शिवाजीराव बंडगर यांना दिले होते. या घटनेनंतर जगताप गट व पाटील गट यामध्ये दुरावा आला होता. या घटनेवर भाष्य नारायण पाटील यांनी यावेळी केले.
माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आपल्या भाषणामध्ये यासंदर्भात बोलताना म्हणाले की, बाजार समिती निवडणुकीच्या वेळेस जी घटना झाली त्यानंतर आमच्यात मतभेद झाले होते. मला तो कोळसा परत काढायचा नाही. परंतु या सर्व गोष्टींना कंटाळून मी माढ्याचे पार्सल 2019 च्या निवडणुकीसाठी आणले होते. परंतु आता हे पार्सल परत करण्याची वेळ आलेली आहे.
आपल्या भाषणात पुढे बोलताना नारायण पाटील म्हणाले की जयवंतराव जगताप यांनीच मला तालुक्याच्या राजकारणात आणलेले आहे. 1992 ला मी जेऊरचा सरपंच झालो होतो. 1993 ला करमाळा बाजार समितीची निवडणूक लागली होती. त्यावेळी जयवंतराव जगताप यांनी मला स्वतः बोलावून ग्रामपंचायत मतदारसंघातुन फॉर्म भरायला लावला. व बाजार समितीवर सभासद म्हणून मला निवडूनही आणले होते.
शेतमालाला भाव द्या, शेतकरीच सरकार चालवायला पैसे देतील – जगताप यांनी केली महायुती वर कडाडून टीका
पुढे बोलताना ते म्हणाले की शाळेत एखाद्या विद्यार्थ्याला पुढे ढकलतात त्याप्रमाणे 2014 च्या निवडणुकीला तालुक्यातील जनतेने मला काठावर पास करून आमदार केलं. आमदार झाल्यानंतर मी तालुक्यातील अनेक रखडलेली कामे केलेली आहेत आणि त्याच कामांवरती 2019 च्या निवडणूकीत मला तालुक्यातून 25 हजारांपेक्षा जास्त लीड मिळाले होते. जयवंतराव भाऊ यांच्या पाठिंब्याने मी निवडून येणार आहे व त्यांच्यासोबत मी या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे.त्यामुळे मला येत्या निवडणुकीत भरघोस मत द्या असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित जनतेला केले.