चिवटे यांच्यासह इतर निष्कासित केलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना पुन्हा सक्रिय होण्याचे आदेश
करमाळा (दि.९) – विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षविरोधी काम केल्यामुळे पदावरून निष्कासित केलेल्या गणेश चिवटे यांच्यासह इतर भाजप पदाधिकाऱ्यांना पुन्हा सक्रिय होण्याचे आदेश आले आहेत.
करमाळा येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार सोडून अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना पाठिंबा देत त्यांचा प्रचार केला होता. पक्षविरोधी काम केल्यामुळे त्यांना भाजप प्रदेश कार्यालयाकडून त्यांना पदावरून निष्कासित करण्यात आले होते. महायुतीचे सरकार स्थापन होताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या आदेशाने संबंधित पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सक्रिय होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
या कार्यकर्त्यांमध्ये जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, मंडल अध्यक्ष राम ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव व युवा मोर्चा अध्यक्ष अमोल पवार यांना पुन्हा एकदा त्याच पदावर रुजू करून सक्रिय करण्यात आले आहे.
याबाबत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे म्हणाले की, आम्ही गेली वीस वर्षे भाजपाचे काम निष्ठेने केले आहे.या पुढील काळातही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,आ.चंद्रकांत दादा पाटील,माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आमच्यावर विश्वास दाखवला व पुन्हा पक्ष संघटनेत सक्रिय केले याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. राज्यात व केंद्रात भाजपा महायुतीची सत्ता आहे त्यामुळे येत्या काळात करमाळा तालुक्याच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर राहणार असून जास्तीत जास्त विकासनिधी आणणार आहोत असेही चिवटे यांनी सांगितले.