महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरींच्या सभेचे आयोजन

करमाळा (दि.११) – करमाळा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांच्या प्रचारार्थ गुरुवारी 14 नोव्हेंबरला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे येणार आहेत. त्यांची सभा केम येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती दिग्विजय बागल यांनी सोशल मीडिया द्वारे दिली.
करमाळा विधानसभेची निवडणूक अत्यंत शिगेला पोहोचली असून मतदारसंघातील चारही महत्त्वाचे उमेदवार संजयमामा शिंदे, नारायण पाटील, दिग्विजय बागल व रामदास झोळ यांचा गावोगावी जोरदार प्रचार सुरू आहे. गावोगावी छोट्या- मोठ्या सभा, पदयात्रा, सोशल मीडिया या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यातील मोठे नेते देखील प्रचारार्थ हजेरी लावत आहेत.
महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांच्या प्रचार सभेला आठ नोव्हेंबरला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येऊन गेले. त्यानंतर दहा नोव्हेंबरला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील सभेला येऊन गेले. आता 14 नोव्हेंबरला गुरुवारी केंद्रीय केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी येणार आहेत. गडकरी यांचे भाषण ऐकण्यासाठी जनतेमध्ये उत्सुकता लागलेली आहे.
सोशल मीडियावर केलेल्या आवाहनामध्ये श्री बागल म्हणाले की, ही सभा करमाळा मतदार संघासाठी महत्त्वाची असून आपण या मतदारसंघातील प्रश्न गडकरी साहेबांपुढे मांडणार आहोत. त्यामुळे येत्या गुरुवारी सकाळी नऊ वाजता जास्तीत जास्त जनतेने या सभेला उपस्थित राहावे असे त्यांनी आवाहन केले.




