नारायण पाटील यांची आज करमाळा शहरात सभा – जगताप काय बोलणार जनतेमध्ये उत्सुकता

करमाळा (दि.२) – तालुक्याच्या राजकारणातील महत्त्वाचा गट असलेल्या जगताप गटाने नुकतेच मंगळवारी (२९ ऑक्टोबर) महाविकास आघाडीचे उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते नारायण पाटील यांना जाहीर पाठींबा दिला. त्यानंतर जगताप गट व पाटील गटाची एकत्रित पहिली सभा आज शनिवारी (दि. 2 नोव्हेंबर) दुपारी दोन वाजता करमाळा येथील महात्मा गांधी हायस्कूल येथे होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) करमाळा शहर व तालुका यांनी या सभेचे आयोजन केले आहे. माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची प्रमुख उपस्थित यावेळी असणार आहे. जगताप गटाने अकलूज येथे मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत माजी आमदार नारायण पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्यानंतर जगताप गटाने बुधवारी (दि.३०) करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना जयवंतराव जगताप यांनी यंदाच्या निवडणुकीला संजयमामा शिंदे यांच्या बरोबर न जाण्याचे थोडक्यात कारण सांगितले होते. परंतु सखोल मध्ये माहिती शनिवारी 2 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जाहीर सभेत सांगू असे सांगितले होते. त्यामुळे ते आजच्या सभेत काय बोलणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलेले आहे.

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जयवंतराव जगताप म्हणाले की फक्त कागदावरचा विकास नकोय. तालुक्यात अनेक कामे आहे, ज्याची बिले उचलली आहेत परंतु ती कामे कागदावरच आहेत. संजय शिंदे जरी म्हणत असतील की मी विकासाच्या मुद्द्यावर मते मागणार आहे, परंतु तो मुद्दाच त्यांच्याकडे नाही आहे. जर मी लोकांकडे यांच्यासाठी मत मागायला गेलो तर लोक मला म्हणतील की तुम्ही सांगितलं म्हणून यांना मागच्या वेळेस मत दिले पण ५ वर्षात विकास कुठे आहे? या गोष्टीमुळे मी शिंदे यांच्या बरोबर गेलो नसल्याचे त्यांनी प्राथमिक दृष्टया सांगितले. अधिक माहिती ते शनिवारच्या सभेत देणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे काय नवीन ऐकायला मिळणार याची जनतेत उत्सुकता आहे.




