कंदर येथे दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव व साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – कंदर (ता.करमाळा) येथे आज शनिवारी (दि.२३) करमाळा तालुक्यातील दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव व साहित्याचे (MITRA) प्रविणसिंह परदेशी (IAS), माजी आमदार नारायण पाटील, भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील, दिग्विजय बागल, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
या साहित्याचे वाटप केंद्र शासन (एलिम्को), जिल्हा परिषद सोलापूर समाज कल्याण विभाग,शिवरत्न शिक्षण संस्था अकलूज,श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट अकलूज व डाॅटर्स माॅम्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वयोश्री व ए.डी.आय.पी. योजने अंतर्गत आ.रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे काही महिन्यांपूर्वी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तपासणी केलेल्या दिव्यांगांना आज साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या वतीने दिव्यांगांसाठी जनकल्यानाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत, त्याच पद्धतीने ग्रामीण भागातील युवकांसाठी असलेल्या योजना देखील राबविणे आवश्यक आहे त्यानुसार भविष्यात कृषी पूरक प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले.
याचाच धागा पकडून श्री. प्रवीणसिंह परदेशी म्हणाले की, केन्द्र सरकारच्या दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत चांगल्या योजना आहेत त्याचा सर्व दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा. यापूर्वी मी सोलापूर जिल्हाधीकारी म्हणुन कार्यरत असताना करमाळा भागातील गरजा वेगळ्या होत्या, आता काळानुसार त्या बदलल्या आहेत. त्यानुसार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार युवकांच्या कृषी पुरक प्रक्रिया उद्योगांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन श्री परदेशी यांनी दिले.
याप्रसंगी भारतनाना पाटील, मा.सरपंच अजित तळेकर, डॉ.अमोल घाडगे, भाजपा तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके, शहर अध्यक्ष जगदीश अग्रवाल, कारखाना संचालक नानासाहेब लोकरे, महेंद्र पाटील, शिवशंकर माने, राजकुमार सरडे, मौलासाहेब मुलाणी, विजय नवले, एलिम्को संस्थेच्या रोहिणी कारंडे, मेहंक मेहता, विभुती साहु, दिव्यांग बांधव यांचेसह परिसरातील नेते मंडळी, सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, ग्रा.पं.सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते.