विकासकामाच्या जोरावर आगामी विधानसभा निवडणूकीत आ. शिंदे यांना पुन्हा संधी मिळणार : राजेंद्र बारकुंड
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून करमाळा तालुक्यातून अनेक प्रलंबित प्रश्न व विकासकामे मार्गी लागत असून, त्याचा प्रत्यय नुकताच नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनातून दिसून आला आहे. जातेगाव ते टेंभूर्णी रस्ता, तालुक्यातील विविध गावासाठी तलाठी व सर्कल कार्यालयाच्या इमारतीसाठी दिलेला निधी, ग्रामीण भागातील रस्ते, कुकडीचे आवर्तन, दहिगावचे चालू पाणी यामुळे आमदार शिंदे यांच्या कामावर तालुक्यातील जनता खुश असून आगामी येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे हेच पुन्हा आमदार होतील, असा विश्वास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी व्यक्त केला आहे.
आ. शिंदे यांच्या विविध विकासकामाबाबत माहिती देताना श्री. बारकुंड सा.संदेशशी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, की आ. शिंदे हे आमदार झाल्यापासून करमाळा तालुक्यात सर्व शासकीय कार्यालयातील हस्तक्षेप बंद झाला असून, सर्व अधिकाऱ्यांना कोणत्याही दडपणाशिवाय व कमिशनशिवाय काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची कामे होण्यात अडथळा येत नाही. कोरोनाचा काळ सोडलातर आ. शिंदे हे नेहमीच विकासकामात अग्रेसर राहिले आहेत. करमाळा तालुक्याच्या दृष्टीने दहिगाव उपसासिंचन योजना व कुकडी योजना या अतिशय महत्वाच्या असून, या योजनेचे पाणी मिळण्यासाठी आमदार शिंदे यांनी काटोकाट प्रयत्न केला आहे.
आ. शिंदे यांच्या कालावधी दहिगाव उपसासिंचन योजना कायमस्वरूपी चालू राहिली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. ५ डिसेंबर
रोजी दहिगाव उपसासिंचन योजनेच्या बंद नलिका वितरण प्रणाली कामाचा शुभारंभ नुकताच झाला आहे. यामुळे ५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच कुकडीचे आवर्तनही शेतकऱ्यांना मिळत आहे. पश्चिम भागातील महत्वाच्या डिकसळ पुलाचा प्रश्नही मार्गी लावला असून या पुलाचेही काम चालू झाले आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात करमाळा तालुक्यातील रस्त्यासाठी ६८ कोटीचा निधी आ.शिंदे यांनी मंजूर केला आहे. या निधीतूनच जेऊर-शेटफळ-चिखलठाण कुगाव या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून या रस्त्यासाठी १० कोटी ४० लाख रूपयाचा निधी मंजूर झाला आहे. चिखलठाण गावातील तलाठी कार्यालयासाठी १५ लाखाचा निधी आ. शिंदे यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. तलाठी व सर्कल कार्यालयासाठी संपूर्ण तालुक्यात ४ कोटी २० लाखाचा निधी आ. शिंदे यांनी मंजूर केला आहे.
आमदार निधीबरोबरच इतर नवीन बांधकामासाठी आ. शिंदे जवळपास १२० कोटी रूपयाच्या आसपास निधी तालुक्यासाठी मंजूर करून आणला आहे. याबरोबरच रस्ते, वीज, पाणी या समस्या सोडविण्याचे नेहमीच काम चालूच आहे. याशिवाय ऊसाचा प्रश्नही कारखान्याच्या माध्यमातून आ. शिंदे यांनी सोडविला आहे.
या सर्व विकासकामामुळे येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे यांनाच पुन्हा संधी मिळेल; असा विश्वास श्री.बारकुंड यांनी व्यक्त केला आहे.