तालुक्याच्या राजकारणात रंगत - जगतापांचा संजयमामा ऐवजी नारायण आबांना पाठींबा -

तालुक्याच्या राजकारणात रंगत – जगतापांचा संजयमामा ऐवजी नारायण आबांना पाठींबा

0

करमाळा (दि.२९) –  करमाळा विधानसभा मतदार संघात रोज नव्यानव्या घडामोडी घडत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल यांना थेट शिंदे शिवसेनेतून महायुतीची उमेदवारी जाहीर झाली आहे. याच प्रकारे माजी आमदार जयवंतराव जगताप हे निवडणूक लढवणार की पाठींबा देणार आणि पाठींबा दिला तर नेमका कोणाला देणार याबाबतचीही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत श्री. जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार नारायण आबा पाटील यांना जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे पाटील यांचे पारडे याक्षणी जड झाले आहे.

करमाळा तालुक्यामध्ये प्रत्येक विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे चमत्कार घडतात आणि मतदारही त्यादृष्टीने निश्चितच निर्णायक मतदान करत असतात. माढा लोकसभा मतदारसंघातील मतदार असतानाही सन २०१४ मध्ये माजी आमदार नारायण आबा पाटील व रश्मी बागल यांची चुरशीची लढत झाली होती. त्यात ते विजयी झाले होते.
सन २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत नारायण आबा पाटील व विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आपले पाठबळ आमदार शिंदे यांना दिले होते. यावेळी नेमका बदल होत श्री.जगताप यांनी श्री.पाटील यांना आपले पाठबळ जाहीर केल्याने या निवडणुकीचे चित्र पालटत असल्याचे दिसून येत आहे.

महाविकास आघाडीसाठी सध्याचे वातावरण अत्यंत चांगले आहे. याच महाविकास आघाडीची उमेदवारी पाटील यांना मिळाल्याने एक बाजू भक्कम झाली होती. श्री.जगताप यांच्या पाठींब्याने दुसरी बाजू भक्कम झाली आहे. श्री.जगताप यांना मानणारा या तालुक्यात मोठा वर्ग असून प्रत्येक गावात जगताप गटाचे अस्तित्व आहे. दोन गट एकत्र आल्याने सध्याच्या स्थितीला पाटील गटाच्या कार्यकर्त्यात मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मतदानच नव्हेतर जगताप यांच्या सभा ऐकण्यासाठी तालुक्यातील नागरीक उत्सुक असतात. त्याचा फायदाही श्री. पाटील यांना या निवडणुकीत मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!