संभाजीराजे प्रतिष्ठाण व व्यापारी संघटनेच्या सीसीटीव्ही बसविण्याच्या मागणीला यश
करमाळा (दि.१७ ) – करमाळा शहरात महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी आमदार संजयमामा शिंदे यांनी नुकताच शासनाकडून मंजूर करवून घेतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठाण व व्यापारी संघटनेच्या मागणीला यश आले आहे. याचबरोबर करमाळा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी दहिगांव येथे २ इलेक्ट्रिक पंप बसविण्यासाठी 1 कोटी 40 लाख निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संजय घोलप यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठान करमाळा व व्यापारी संघटना यांनी शहरातील सुरक्षेच्या प्रश्नासाठी शहरातील प्रमुख चौकात व बायपास शाळा परीसरात जवळपास 300 cctv कॅमेरे बसवण्याची मागणी संजयमामा शिंदे यांच्याकडे केली होती. यानंतर आमदार शिंदे यांनी आमदार फंडातून निधी उपलब्ध करून दिला आहे.
करमाळा शहराला पाणी पुरवठा करण्यात येणारी दहिगाव येथील इलेक्ट्रिक मोटर सतत खराब होत असल्याने पाणी टंचाई होत आहे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिकेत महिलांसह निवेदन दिले होते.याची दखल आमदार शिंदे यांनी घेतली असल्याचे संजय घोलप यांनी सांगितले.
आमदार संजयमामा शिंदे यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळलेला आहे त्याबद्दल त्यांचे खूप आभार. करमाळा शहरासाठी त्यांनी फार मोठा निधी दिला आहे. इतका मोठा निधी पहिल्यांदाच शहरासाठी मंजूर झाला आहे.
करमाळा शहरात या आधी हाजी हाशमोद्दिन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करमाळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परीसरात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परीसरात सीसीटीवी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने करमाळा बस स्थानक परिसरात सीसीटीवी कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.
करमाळा शहरात होणाऱ्या गाड्यांची चोरी, घरफोडी, महिलांची छेडछाड या सारख्या गुन्ह्यांवर आळा बसण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने करमाळा शहरात ज्या ज्या ठिकाणी गरज आहे अशा ठिकाणी सीसीटीवी कॅमेरा बसविण्यात यावेत अशी मागणी डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम फाउंडेशनचे समीर शेख यांनीही प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागणी केली होती.