राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीसपदी संतोष वारे – कार्यकर्त्यांच्या निष्ठेला मिळाली दाद!

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.७ : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षा च्या सोलापूर जिल्हा (ग्रामीण) सरचिटणीसपदी करमाळा तालुक्याचे माजी तालुका अध्यक्ष संतोष वारे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी ही निवड केली असून, नियुक्तीपत्राचा वितरण सोहळा खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ७) अकलुज येथे पार पडला.

संतोष वारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अत्यंत क्रियाशील, समर्पित व जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी तालुका अध्यक्षपद भूषवित असताना पक्ष संघटनेत कायम चैतन्य निर्माण केले होते. त्यांच्या सक्रिय नेतृत्वाची दखल घेत पक्षाने त्यांना जिल्हास्तरीय जबाबदारी देऊन सन्मानित केले आहे. अगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची निवड महत्त्वाची मानली जाते.

या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अनिल तोडकर, करमाळा तालुका अध्यक्ष अमरजित साळुंके, माढा तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष केशव चोपडे, तसेच वीट विकास सोसायटीचे संतोष ढेरे आदी मान्यवर उपस्थित होते.

संतोष वारे यांच्या या निवडीमुळे करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, “कार्यकर्त्यांच्या निष्ठेला आणि जनतेच्या सेवाभावाला मिळालेली ही योग्य दाद” अशा शब्दांत सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.



