देवळाली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आशिष गायकवाड यांचे सदस्यपद जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द - Saptahik Sandesh

देवळाली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आशिष गायकवाड यांचे सदस्यपद जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द

Oplus_131072

करमाळा (दि.१२) : करमाळा तालुक्यातील देवळाली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आशिष गायकवाड यांचे सदस्यपद उपजिल्हाधिकाऱ्यांनी रद्दबातल ठरवले आहे. शासकीय इमारतीवर अतिक्रमण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

देवळाली ग्रामपंचायतीची मुदत २०२१ ते २०२५  अशी असुन आशिष कल्याणराव गायकवाड यांनी यापूर्वी सरपंचपद भूषवले होते.  देवळाली येथील सुधीर विलास आवटे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे  गायकवाड परिवाराने शासकीय अंगणवाडी इमारतीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून शासकीय स्वस्त धान्य दुकान थाटले असल्याची लेखी तक्रार केली होती तसेच श्री गायकवाड यांना पदावरून बडतर्फ करावे अशी देखील मागणी त्यांनी केली होती.

आवटे यांच्या तक्रारीनंतर ग्रामसेवक व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी गावातील पंचांच्या उपस्थितीत या अतिक्रमीत जागेची पाहणी करुन अहवाल सादर केला. या अहवालावरून अतिक्रमण केल्याचे समोर आले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी माजी सरपंच व विद्यमान सदस्य आशिष गायकवाड यांना पुरावे देण्याबाबत व म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली . मात्र त्यांना पुरावे देता आले नाहीत, त्यामुळे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (ज-3) व 16 प्रमाणे उत्तरवादीनां ग्रामपंचायत सदस्य राहण्यास अपात्र ठरवुन त्यांची निवड रद्द केली. १० डिसेंबर २०२४ रोजी हा निर्णय दिला. सुधीर आवटे यांच्या वतीने अ‍ॅड. लक्ष्मीकांत गवई  यांनी बाजू मांडली.

गायकवाड यांनी सदस्यपदाचा पदभार घेतल्यानंतर मी सदर शासकीय जागेवर असलेले अतिक्रमण खाली करावे व चिमुकल्यांची जागा त्यांना द्यावी अशी सतत सहा महिने वारंवार कल्पना आशिष गायकवाड यांना केली होती, परंतु ती बाब त्यांनी गंभीरतेने घेतली नाही आणि सदरचे अतिक्रमण काढून टाकले तर नाहीच पण उलट भाषा वापरली गेली म्हणून मी रीतसर जिल्हाधिकारी यांच्याकडे गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. सदर तक्रारीचा निकाल तक्रार दाखल केल्यापासून सहा महिन्याच्या आत मिळून त्यांचे सदस्य पद रद्द होणे अपेक्षित होते, परंतु केवळ आणि केवळ माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वरदहस्तामुळे सदर केस चा निकाल लागण्याकरिता चार वर्षाचा कालावधी लागला.

  • सुधीर आवटे, देवळाली (तक्रारदार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!