सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पंचायत समितीची निवडणूक लढवणार – शंभूराजे फरतडे यांचा निर्धार

केम(संजय जाधव): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर हिसरे पंचायत समिती गण सर्वसाधारण (open) उमेदवारासाठी असल्याने या गणात चुरस वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर युवासेना तालुकाप्रमुख समाधान उर्फ शंभूराजे फरतडे यांनी या गणातून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे,

निवडणूक लढवण्याविषयी माहिती देताना शंभूराजे फरतडे म्हणाले की, “मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. मला शेतकरी, विद्यार्थी, कामगार वर्गाचे प्रश्न जवळून माहित आहेत. ही निवडणूक माझ्यासाठी सत्तेची नव्हे, तर सर्वसामान्यांचा आवाज बनण्याची लढाई आहे. शासनाच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचावा, सामान्य माणसांचे प्रश्न सोडवले जावेत, हीच माझी प्राथमिकता असेल. हार-जीत माझ्यासाठी गौण असून लोकांचा विश्वास मिळवणे हेच माझे ध्येय आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मशाल चिन्हावर ही निवडणूक लढवून, सामान्य नागरिकांच्या आशीर्वादाने हिसरे गणातील प्रत्येकाचा आवाज बनण्याचा माझा प्रयत्न असेल.

माझ्या वडिलांनी म्हणजेच उ.बा.ठा. शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांनी व मी नेहमीच या भागातील विविध जनहिताच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली आहे. वीज बंद काळातील वीजबिल माफी, टंचाई काळात दोन तास वीज उपलब्ध करणे, कुकडीचे पाणी सिना-कोळगाव धरणात सोडण्याची मागणी, आठ तासांचा वीजपुरवठा, आवाटी सबस्टेशन पूर्णत्वास नेणे, हिसरे पुलाची उंची वाढवणे यांसारख्या विषयांवर त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. त्याचबरोबर आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, शालेय साहित्य वाटप, नेत्रतपासणी शिबिरे यांसारख्या उपक्रमांतून सामाजिक कार्य हाती घेतले.





 
                       
                      