आदिनाथ कारखान्याच्या मॉलिशियस विक्रीत ३२ लाखांचा भ्रष्टाचार - शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा आरोप - Saptahik Sandesh

आदिनाथ कारखान्याच्या मॉलिशियस विक्रीत ३२ लाखांचा भ्रष्टाचार – शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा आरोप

करमाळा(दि.१) : आदिनाथ कारखाना कर्जाच्या ओझ्याखाली डुबलेला असताना कारखान्याकडे असलेली जवळपास 1000 मेट्रिक टन मळी आठ हजार पाचशे रुपये प्रति टन दराने विकली आहे. सध्या या मळीचा बाजारात भाव 13 हजार रुपये मेट्रिक टन आहे. या व्यवहारात जवळपास 32 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून हा प्रकार म्हणजे मढयावरच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असून या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी आदिनाथ कारखान्याचे माजी प्रशासक तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे.

गतवर्षी आदिनाथ कारखान्याची गाळप झाल्यानंतर साखर बाहेर निघाली नाही. त्यामुळे या मळीत मोठ्या प्रमाणावर साखर असल्यामुळे अत्यंत चांगल्या प्रतीचे हे मॉलिशियस तयार झाले होते. पण त्यावेळेस कामगारांनी ही मळी विकू दिली नाही. आता मात्र महसूल प्रशासनाने ही मळी ताब्यात घेऊन विक्रीस काढली होती. व्यवहार मात्र कार्यकारी संचालक बागवनवर यांच्या उपस्थितीत झाला. मळीचे टँकर वजन करताना सुद्धा फेरफार झाली असून याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

गतवर्षी झालेले गाळप व उत्पादित झालेली साखर याचे प्रमाण पाहता किमान पंधराशे ते सोळाशे मेट्रिक टन मळी निर्माण झालेली होती. असा उत्पादन विभागाने अहवाल सुद्धा दिला होता. मात्र प्रत्यक्षात किती मॉलिशियस विकले पैसे किती जमा झाले याचाही आकडा प्रशासन संचालकाकडून दिला जात नाही.

आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी पुढाकार घेऊन आपली राजकीय ताकद वापरून संचालक मंडळ बदलून आपल्या समर्थकांची संचालक पदी नियुक्ती केली होती.
त्यामुळे या मॉलिशियसच्या व्यवहारात संदर्भात नेमके काय झाले हे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सभासदांपुढे मांडावे अशी मागणी ही जिल्हाप्रमुख चिवटे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!