केम स्टेशनवर हळदूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसचे शिवसेना महिला आघाडीने केले स्वागत
केम (प्रतिनिधी/संजय जाधव)- रेल्वे विभागाच्या वतीने प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी पुणे ते हळदूर विशेष गाडी सुरू केली आहे. ही गाडी पुण्याहून सकाळी ६:१० वाजता निघून ती केमला सकाळी ८:५५ ला येते आणि १२:५० ला हळदूर ला पोहचते. दुपारी ही गाडी ३ वा. निघून केमला सायंकाळी ६:२० ला पोहोचते.
काल (दि.१०) रोजी ही गाडी प्रथमच केम स्टेशनवर आली. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने चालकांचा हार, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. या वेळी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख वर्षा चव्हाण केम शहर प्रमुख सौ आशा मोरे, युवती सेनेच्या गौरी मोरे, शीला, नंदिनी माने तसेच श्री.रंदवे, बिभीषण नागणे, आण्णा मोरे युन्नस पठाण आदिजण उपस्थित होते.
या प्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख वर्षा चव्हाण म्हणाल्या की, केम येथील प्रवाशांना पुणे, मुंबई लातुर कुर्डूवाडी जाण्यासाठी सोय झाली त्याबद्दल मी रेल्वे विभागाचे आभार मानते, परंतु सोलापूरला जाण्यासाठी सकाळी कोणतीही गाडी उपलब्ध नाही. केम व परिसरातील सोलापूर ला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विविध कामांसाठी तसेच अनेकजण नौकरी निमित्त व्यवसायासाठी, दवाखान्यात जिल्हा परिषद मध्ये नागरिकांना कामानिमित्त सोलापूर ला जावे लागते. सोलापूर हून सायंकाळी येण्यासाठी कन्याकुमारी पुणे गाडी आहे परंतु सोलापूर ला जाण्यासाठी सकाळी गाडी नाही. तरी रेल्वे विभागाने सोलापूर ला जाण्यासाठी सकाळी कोणतीही गाडी थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत.