करमाळ्याचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी बांधले शिवबंधन
करमाळा – करमाळा शहराचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी काल (दि.१९) शुक्रवारी मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.
जगताप घराण्याला काँग्रेस पक्षाचा मोठा वारसा आहे. असे असले तरी वैभवराजे यांचे बंधू शंभूराजे जगताप हे सध्या भाजपा मध्ये काम करत आहेत. त्यामुळे वैभवराजे जगताप यांनी शिवेसेनेत केलेल्या प्रवेशावरून जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वैभवराजे जगताप यांचे वडील करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी २००४ साली विधानसभे साठी शिवसेनेचे तिकीट घेतले व निवडूनही आले होते. त्यानंतर थेट आता वैभवराजे जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
काल उद्धव ठाकरे व वैभव राजे यांच्यात प्रवेशाआधी तब्बल चाळीस मिनिटे बंद खोलीत चर्चा झाली. वैभवराजेंच्या प्रवेशाने करमाळ्यात शिवसेनेला एक आश्वासक नेतृत्व मिळाल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई, युवासेनेचे वरुण सरदेसाई व इतर पदाधिकारी उपस्थित होते. उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी,बाळासाहेब कांबळे,गणेश कुकडे,शाहबाज घोडके,राम काळे यांच्यासह इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्त्वानुसार काम करुन येत्या काळात शिवसेनेचे काम प्रामाणिकपणे करुन करमाळा तालुक्यात पक्ष विस्तार करणार आहे.
– वैभवराजे जगताप, माजी नगराध्यक्ष, करमाळा
करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव राजे जगताप यांनी शिवसेनेत केलेला प्रवेश निश्चित स्वागतार्ह आहे. करमाळा तालुक्यात शिवसेना बळकट होण्यासाठी त्यांचा पक्षाला नक्कीच फायदा होईल.
–वर्षां चव्हाण, अध्यक्षा, शिवसेना महिला आघाडी, करमाळा