टक्केवारी न दिल्यास काम होऊ न देणाऱ्यांचा बंदोबस्त करावा – तहसीलदारांना निवेदन

करमाळा(दि.५) : दहिगाव योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे पोकलेन पळून लावणे, पाईप जाळून टाकणे असे प्रकार घडत असून टक्केवारी न दिल्यास काम होऊ देणार नाही अशी गुंडगिरी करणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करावा अन्यथा दहा दिवसानंतर तीव्र आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष शिवराज जगताप यांनी दिला आहे. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भरत अवताडे,विद्यार्थी सेनेचे अशपाक जमादार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती देताना, शिवराज जगताप म्हणाले की, दहिगाव योजनेमुळे तालुक्यातील पूर्व भागातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी या योजनेला एक हजार कोटी रुपये मंजूर करून या योजनेचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. मात्र सध्या या योजनेचे ठेकेदाराला दमदाटी करून त्याचे पोकलेन जाळून टाकण्याची दमदाटी करणे, काम करणारे कामगार पळून लावणे असे प्रकार घडले आहेत. दहिगाव योजनेचे संबंधित ठेकेदाराचे १५ लाख रुपयांचे पाईप जाळून टाकले आहेत. त्यामुळे याबाबत चौकशी करून अशा गुंडाचा बंदोबस्त करावा अशी मागणी जगताप यांनी केली.
काय आहे प्रकरण?

करमाळा तालुक्यात दि इंडीया ह्युम पाईप कंपनीकडून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे कॅनॉलमध्ये पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. कुंभेज येथील कॅनॉलमध्ये टाकण्यासाठी आणलेले पाईप अज्ञात व्यक्तीने जाळून १५ लाख रुपयांचे नुकसान केले आहे. या संदर्भात कंपनीचे साईट मॅनेजर नचिकेत दिलीप राजमाने यांनी अज्ञात व्यक्ति विरोधात करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १५ फेब्रुवारी सायंकाळी सहा ते दि. १६ फेब्रुवारी पहाटे पाच वाजताच्या कुंभेज येथील संदीप भोसले यांच्या शेती गट नं. ५६१ मध्ये घडला आहे. सदर काम गेले २ महिन्यांपासून बंद असल्याने व आता अज्ञात व्यक्तीने हे पाईप जाळल्यामुळे विरोधकांनी आमदार नारायण आबा पाटील यांच्यावर व त्यांच्या कार्यकर्त्यांवर टीकेची झोड उठवली आहे.





