करमाळा बाजार समितीच्या निवडणूकीसाठी उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना उद्या सोमवार दि.४ सप्टेंबर पासून ते ८ सप्टेंबर पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. पुढील महिन्यात ८ ऑक्टोबरला मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी लगेच ९ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे.
मागील निवडणूक ही २०१८ साली झाली होती. २०१८ च्या बाजार समितीच्या निवडणूकीत १८ सदस्यांच्या संचालक मंडळात आठ जागा बागल गटाला, आठ जागा जयवंतराव जगताप – नारायण पाटील गटाला तर २ जागा संजयमामा शिंदे गटाला मिळाल्या होत्या. सभापती च्या निवडी वेळी शिंदे गटाच्या दोन्ही उमेदवारांनी जगताप गटास पाठिंबा दिला. त्यामुळे जगताप गटाचे १० व बागल गटाचे आठ असे बलाबल व्हायला हवे होते. पण जयवंतराव जगताप हे दोन जागांवरून निवडून आले होते. त्यामुळे त्यांच्या गटाचे एक मतदान आपोआपच कमी झाले. त्यामुळे जगताप गटाचे नऊ तर बागल गटाचे आठ असे समीकरण होते. सभापतिपदाचे आश्वासन मिळाल्यानंतर शिवाजीराव बंडगर यांनी निवडणुकीच्या अगोदर शेवटच्या क्षणी बागल गटात उडी मारल्याने बागल गटाचे नऊविरुद्ध जगताप गटाचे आठ असे बलाबल झाले.
दोन जागी निवडणूक लढवून जयवंतराव जगताप गटाला नुकसानकारक ठरले. नऊविरुद्ध आठ मतांनी शिवाजीराव बंडगर बाजार समितीचे सभापती झाले. करमाळा बाजार समितीच्या स्थापने पासून काही अपवाद वगळता जगताप गटाचेच वर्चस्व होते. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सलग २९ वर्षे बाजार समितीचे सभापती पदी कामकाज पाहीले आहे. २०१८ साली नव्याने झालेले सभापती शिवाजीराव बंडगर यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
२०२३ च्या निवडणुकीत एकूण १८ जागांपैकी सोसायटी मतदारसंघासाठी ११ जागा आहेत. यामध्ये सर्वसाधारण ७, महिला राखीव २, इतर मागासवर्ग १ व भटक्या विमुक्त १ अशा जागा आहेत. ग्रामपंचायतीच्या ४ जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी २, एस सी साठी १ व आर्थिक दुर्बल साठी १ जागा आहे, व्यापारी वर्ग २ व हमाल तोलार साठी १ अशा जागा आहेत.