करमाळा-माढा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार उद्या ठरण्याची शक्यता
करमाळा (दि.१९) – महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी असणार आहे. असे असले तरी करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघातून अजून महायुती व महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले नाही.
महायुतीकडून ज्यांना हमखास उमेदवारी मिळणार होती असे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी महायुतीची उमेदवारी नाकारून अपक्ष उभारण्याची भूमिका जाहीर केली आहे. आमदार शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे समर्थक असल्याने या मतदार संघात महायुतीतील इतर घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा (शिंदे गट) उमेदवार उभा करणार की भाजपचा याबाबत अद्याप निश्चित झालेले नाही.
असे असलेतरी शिवसेनेकडून महेश चिवटे तर भाजपकडून रश्मी बागल/दिग्विजय बागल यांनी निवडणूक लढवण्याची दृष्टीने जोरदार तयारी केली असून ग्रामीण भागातील दौरे वाढवले आहेत. महायुतीकडून उमेदवारी घेण्यासाठी दोन्ही गटाकडून वरिष्ठांकडे फिल्डिंग लावण्याचे काम सुरू आहे.
करमाळा मतदार संघ गेल्या २५ वर्षापासून शिवसेना धनुष्यबाणावर लढवत असून यंदाही हा मतदार संघ शिवसेनाच लढवणार असा दावा शिवसेनेच्या प्रवक्ते ज्योतीताई वाघमारे सोलापूर लोकसभा जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे युवा सेनेचे सचिव किरण साळी तालुका संपर्कप्रमुख रवी आमले यांनी करमाळाच्या दौऱ्यात वारंवार केला. शिवसेनेकडून महेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे आग्रह धरला असल्याची माहिती तालुका संपर्कप्रमुख रवी आमले यांनी दिली.
भाजपने देखील करमाळा-माढा मतदारसंघावर दावा केला असून रश्मी बागल यांना करमाळा विधानसभेतून महायुतीची उमेदवारी देण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व आमदार श्रीकांत भारतीय यांनी आग्रह धरल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांना महायुतीने पुरस्कृत करावे असाही प्रस्ताव समोर येत आहे.
उद्या (दि.२०) बाळासाहेब भवन मुंबई येथे महायुतीची उमेदवारी संदर्भात चर्चा होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातुन महायुती कुणाला उमेदवारी देणार याकडे कार्यकर्त्यांचे व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवसेनेकडून मी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे, तरी शिवसेनेने दुसरा कोणी माझ्यापेक्षा चांगला उमेदवार दिला तर माझी हरकत नाही. मात्र उमेदवार धनुष्यबाणावरच निवडणूक लढवणारा पाहिजे ही भूमिका मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली. – महेश चिवटे, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)