कारखान्यांनी वेळेत ऊस बिल दिले नाहीतर.. ‘जनशक्ती’ करणार भिक मांगो आंदोलन
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – साखर कारखान्यांनी दि. ५ सप्टेंबर २०२३ पर्यंत जर शेतक-यांची ऊस बिले अदा केली नाहीत तर जनशक्ती संघटनेच्या वतीने साखर आयुक्त, साखर संकुल पुणे यांचे दालनासमोर मोठ्या प्रमाणात शेतक-यांचा मोर्चा नेऊन भिक मागो आंदोलन करण्यात येईल असा इशारा जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे दिला.
या निवेदनात पुढील म्हटले आहे की, ऊस कारखान्यांचा गळीत हंगाम संपुन ५ महिने झाले आहेत आणि आज दुसऱ्या हंगामाची तयारी सुरु होण्याच्या मार्गावर आहे. परंतु आजतागायत मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी, कमलाई साखर कारखाना करमाळा, कर्मयोगी साखर कारखाना इंदापूर व ऊस बिल थकवलेले सर्वच साखर कारखान्यांनी शेतक-यांची थकीत ऊस बिले ऊस उत्पादकांना दिलेली नाहीत. हजारो शेतक-यांवर बोगस कर्ज काढली आहेत. शेकडो वाहन मालकांवर कर्ज काढली आहेत. ब-यापैकी कामगारांच्या पगारी थकवल्या आहेत. तसेच ऐन पावसाळी हंगाम असताना देखील दुष्काळ सदृश परिस्थिती असताना कारखान्यांकडुन शेतक-यांची पिळवणुक होत आहे. शेतकरी आत्महत्येसारखा पर्याय निवडत आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उसाचे पीक घेतले, जवळपास दीड वर्ष या उसाची काळजी घेतली. कारखान्याला ऊस घातला. मात्र आज पाच ते सहा महिने होऊन गेले तरी उसाची बिले अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. एकीकडे दुष्काळाने तोंड वर काढले आहे तर दुसरीकडे कारखानदार शेतकऱ्यांच्या पोटावर मारत आहे. त्यामुळे संघटनेच्या वतीने साखर संकुल येथे हजारो शेतकऱ्यांसहित भिक मांगो आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.