शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ‘प्रहार’ चे आमदारांच्या घरासमोर रात्री मशाल आंदोलन

केम(दि.७): शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने मागे घेतलेली भूमिका आणि दिलेली फसवी आश्वासने यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या नाराजीला आवाज देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आता सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ११ एप्रिलच्या रात्री बारा वाजता राज्यातील प्रत्येक आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवून जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी नुकतीच ३० मार्चला राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत करमाळा तालुक्यातून प्रहारचे तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, उपाध्यक्ष पप्पू ढवळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलनाविषयी माहिती देताना प्रहार संघटनेकडून सांगण्यात आले की,शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हा लढा सुरू करण्यात येत असून सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनाचा जाब विचारण्यासाठी हे आंदोलन होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करण्याची घोषणा केली होती. मात्र सत्ता मिळाल्यानंतर कर्जमाफी तीन वर्ष शक्य नसल्याचे स्पष्ट करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे राज्यभरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बच्चू कडू यांनी सरकार विरोधात आंदोलनाचा प्रारंभ केला आहे. या आंदोलनात केवळ कर्जमाफीच नव्हे तर शेतीच्या इतर प्रश्नांवर देखील आवाज उठवला जाणार आहे. शेतीच्या वाढत्या उत्पादन खर्चावर उपाय शोधण्यासाठी शेतमजूरांच्या रोजगार हमी योजनेतून शेतीशी संबंधित कामे शासनाने करावी, अशी मागणीही प्रहार संघटनेने यावेळी केली आहे.

येत्या ११ एप्रिलला राज्यभर मशाल आंदोलन पेटणार असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हे आंदोलन निर्णायक ठरणार असल्याचा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.




