वनविभागात होणाऱ्या अवैध वृक्ष तोडीकडे वनाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे – प्रवीण मखरे

केम (प्रतिनिधी संजय जाधव) – करमाळा तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात आहे. यामध्ये वनविभागातही वृक्षतोड होत आहे. यामुळे या भागातील पशुपक्षी प्राणी संकटात आले आहेत. याविषयी मी मोहोळ वनविभागाच्या कार्यालयात जाऊन लेखी तक्रार पण दिली होती, अद्याप तीन महिने उलटले तरी वनाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नसल्याची माहिती वृक्षप्रेमी, पत्रकार प्रवीण मखरे यांनी दिली.


याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, केम-घोटी मार्गावरील टेकडी परिसरात वन विभाग अंतर्गत येणाऱ्या वर्ग दोन मधील जमिनीवरील वृक्षतोड करण्यात आली आहे. या झाडावरील पक्षांच्या घरट्याचे व अंड्याचे प्रमाण नुकसान झाले त्यामुळे पशुपक्षी संकटात आले. ही बाब लक्षात आल्यावर मी त्वरित मोहोळ वनाधिकारी कार्यालय गाठून वृक्षतोडीचे निवेदन दिले. या घटनेला तीन महिने झाले तरी वन विभाग अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. तरी वनविभागात होणाऱ्या अवैध वृक्ष तोडीकडे वनाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ती रोखावी. असे काम करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी अशी मागणी श्री मखरे यांनी केली.

