हेरवाड ग्रामपंचायतीचा आणखीन एकदा आदर्श उर्वरित ग्राम पंचायतींनीही घ्यावा - प्रमोद झिंजाडे -

हेरवाड ग्रामपंचायतीचा आणखीन एकदा आदर्श उर्वरित ग्राम पंचायतींनीही घ्यावा – प्रमोद झिंजाडे

0
Pramod Zinjade

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने याआधी विधवांना जुन्या प्रथा मधून मुक्त करण्यासाठी व त्यांचा सन्मान करण्यासाठी देशात सर्वप्रथम ठराव मांडला होता. आता देखील महिलांच्या मासिक पाळीशी संबंधीत सर्व रुढी,परंपरा,चालीरितींचे जोखड फेकून देवून मासिक पाळी व्यवस्थापन व जनजागृतीचा मार्ग अवलंबत करत महिलांना सन्मानित करण्याचे पाऊल या ग्रामपंचायतीने उचलले आहे. याचा आदर्श उर्वरीत ग्रामपंचायतींनीही घ्यावा असे आवाहन करमाळा येथील महात्मा फुले समाज सेवा मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व विधवा महिला सन्मान अभियान व संरक्षण हक्क कायदा अभियानाचे प्रणेते प्रमोद झिंजाडे यांनी केले आहे.

मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी केवळ अज्ञानापोटी याबाबत अनेक गैरसमज, अंधश्रद्धा आहेत, ज्यांचा महिलांना मोठा मानसिक त्रास होतो,शिवाय मासिक पाळीच्या व्यवस्थापनासाठी सुविधांचा अभाव असल्याने महिलांची कुचंबनाही होते. हे लक्षात घेवून जागतिक पातळीवरीर 28 मे हा जागतिक मासिक पाळी दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमिवर वॉश अलायन्स, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यात युनिसेफ व सीवायडीएच्या प्रतिनिधींनी मासिक पाळी दिनाबाबत मार्गदर्शन केले. तेव्हा प्रमोद झिजाडे यांनी ग्रामपंचायतींना याबाबत आवाहन करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार त्यांनी समाजमाध्यमांतून तसेच अन्य प्रसारमाध्यमांतून आवाहन केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत हेरवाड(ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) या ग्रामपंचायतीने आणखी आदर्श पाऊल उचलत मासिक पाळी व्यवस्थापन, त्यासाठीची जनजागृती करुन महिलांचा सन्मान करण्याचा निर्धार या ग्रामपंचायतीच्या ग्राम सभेने केला आहे. मासिक पाळीबाबत असा ठराव करणारी ही महाराष्ट्रातील बहुदा देशातील पहिलीच ग्रामसभा आहे.

ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेत पूढील प्रमाणे ठराव केले.

  • 1) स्थानिक शाळा,सामुदायीक केंद्रे व आरोग्य सुविधांमध्ये मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत व्यापक जनजागृती कार्यक्रम राबविणे
  • 2) मासिक पाळीसाठी लागणाऱ्या शोषकांच्या सुनिश्चीतीसाठी सरकारी एजन्सी, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक व्यावसायीकांची भागिदारी करणे तसेच आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटकांवर लक्ष केंद्रीत करुन त्यांसाठी मोफत किंवा माफक दरात सॅनिटरी नॅपकीन्स उपलब्ध करुन देणे
  • 3) शाळा, सामुदायीक केंद्रे तसेच सार्वजनीक स्थळी महिलांसाठी स्वतंत्र व स्वच्छ स्वच्छतागृहांची उपलब्धता करुन देणे
  • 4) वापरलेल्या पॅड्सची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र कचरापेटी, संकलन व्यवस्था व इंसिनिरेटर यांची उपलब्धता करुन देणे
  • 5) स्वच्छता गृहांमध्ये पाणी व हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था करणे
  • 6) मासिक पाळीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांच्या निवारणासाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभारणे यात समुपदेशनाचा सहभाग असून यासाठी युनिसेफ किंवा तत्सम संस्थांचे सहकार्य घेणे
  • 7) मासिक पाळी संदर्भात खुली चर्चा व्हावी यासाठी विचारमंच उपलब्ध करुन देणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!