धनुर्विद्या स्पर्धेत ओम नरूटे राज्यात दुसरा-राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

करमाळा: तालुक्यातील उदयोन्मुख धनुर्धारी ओम अमोल नरूटे याने नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची निवड आता वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी झाली आहे.

ओम नरूटे हा करमाळा तालुक्यातील खांबेवाडी गावचा असून तो पुणे येथील बी. के. एस. आर्चरी अकॅडमी येथे धनुर्विद्याचे प्रशिक्षण घेत आहे. ओमने अल्पावधीतच आपल्या नेमबाजीतील अचूकता, कौशल्य आणि संयम यांच्या बळावर राज्यस्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी या स्पर्धेत एकूण तीन पदके मिळवली —
- ओव्हरऑल स्पर्धा : रौप्यपदक (Silver Medal)
- इंडिव्हिज्युअल इलिमिनेशन : रौप्यपदक (Silver Medal)
- टीम इव्हेंट : कांस्यपदक (Bronze Medal)

ओमने आपल्या यशाचे श्रेय पालक अमोल नरूटे, बी. के. एस. आर्चरी अकॅडमी, पुणे येथील प्रशिक्षक भरत कोराळे आणि क्रीडा शिक्षकांना दिले आहे.
ओम याच्या या कामगिरीनंतर स्थानिक ग्रामस्थ, शिक्षकवर्ग आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वाराणसी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ओम नरूटे यांच्याकडून आणखी उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




