राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत YCM च्या शिवमने केली सुवर्णपदकाची कमाई – गुजरात मधील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
करमाळा (दि.२२) – करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील (YCM) खेळाडू शिवम राजेंद्र चिखले याने राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या अंतर्गत 19 व 20 ऑक्टोंबर 2024 रोजी नांदेड येथे घेण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा पार पडल्या. सतरा वर्ष वयोगट मुले रिकर्व्ह या प्रकारांमध्ये ६० मीटर अंतरावर ३३३ गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्ण पदक व दुसऱ्या ६० मीटर अंतरावर ३३२ गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त करून रौप्यपदक तर एकूण अंतिम गुणांकामध्ये ६६५ गुण प्राप्त करून राज्यात प्रथम येऊन त्याने सुवर्णपदकाची कमाई केली. त्याच बरोबर एलिमेशन राउंड या प्रकारामध्ये पुणे विभागात सुवर्णपदक पदक प्राप्त केले आहे. अशा प्रकारे त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये तीन सुवर्ण व एक रौप्य पदकाची कमाई करून दाखविली.
आत्तापर्यंतच्या चालू असलेल्या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पदकांची कमाई करणारा शिवम चिखले हा एकमेव खेळाडू ठरला असून त्याला या स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.राम काळे यांचे मार्गदर्शन लाभले. शिवम चिखले याची ११ नोहेंबर २०२४ रोजी नाडियाड (गुजरात) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
शिवमने महाविद्यालयाचे व तालुक्याचे नाव राज्य पातळीवर झळकवले आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.