केत्तूर येथे कोर्टी बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
करमाळा (ता. १७) – मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा मैदानावर खेळ खेळून आपले आरोग्य अबाधित ठेवावे, असे प्रतिपादन विस्तार अधिकारी डॉ. नितीन कदम यांनी केत्तूर येथे केले.
कोर्टी (ता. करमाळा) या बीट अंतर्गत येथील नेताजी सुभाष विद्यालयाच्या डॉ. बापूजी साळुंखे क्रीडांगणावर कोर्टी बिटस्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी विस्तार अधिकारी डॉ. नितीन कदम म्हणाले की, आजच्या काळात मुले मैदानावर दिसत नाहीत. या सर्वांमुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व वाढ होत नाही. या सर्वामुळे मुलांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटल्यासारखी झाली आहे. खेळामुळे सांघिक भावना, एकात्मता, जिद्द, चिकाटी हे गुण विकसित होतात असे प्रतिपादन यांनी केले. मोबाईलमध्ये अडकून घरात मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा मैदानावर खेळ खेळून आपले आरोग्य अबाधित ठेवावे. आज- काल पालक मुलांना मोबाईल गेममध्ये गुंतवून ठेवत आहेत.
सुरवातीला डॉ. बापूजी साळुंखे आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पर्यवेक्षक बी. जी. बुरुटे तर सर्व खेळाडूंना सहशिक्षक के. सी. जाधवर यांनी क्रीडा शपथ दिली. या स्पर्धेमध्ये कोर्टी बिटातील केत्तूर, जिंती व कोर्टी या केंद्रातील सर्व शाळांनी सहभाग नोंदविला. सांघिक खेळामध्ये कबड्डी, खो-खो व लंगडी या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. तर वैयक्तिक खेळामध्ये बुद्धिबळ, १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे या प्रकारांचा समावेश होता.
इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी या दोन विभागात क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिंती केंद्रप्रमुख महावीर गोरे, कोर्टी केंद्रप्रमुख आजिनाथ देवकते, केत्तूर केंद्रप्रमुख विकास काळे, केंद्रीय मुख्याध्यापक विलास दुरंदे, सहशिक्षक शिवाजीराव येडे, श्री. मोहिते गुरुजी, शहाजी देवकते, भोसले गुरुजी, नेताजी सुभाष विद्यालयातील शिक्षकांचे सहकार्य लाभले. क्रीडांगणाच्या नियोजनासाठी प्राचार्य के. एल. जाधव यांनी मार्गदर्शन केले.