NDA मॅरेथॉनमध्ये करमाळा तालुक्यातील राऊत व शिंदे या शिक्षकांचा सहभाग
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) च्या स्थापनेला जानेवारी २०२४ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने संस्थेकडून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून ‘NDA मॅरेथॉन’ ही स्पर्धा १५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये करमाळा तालुक्यामधील विजय राऊत व सचिन शिंदे यांनी या स्पर्धेत यशस्वीपणे सहभाग नोंदविला.
विजय राऊत हे जि.प. प्राथमिक शाळा शेळकेवस्ती दहिगाव या शाळेचे शिक्षक असून सचिन शिंदे हे जि.प. प्राथमिक शाळा जाधव वस्ती वांगी २ या शाळेचे शिक्षक आहेत.
ही मॅरेथॉन स्पर्धा ४२ किलोमीटर,२१ किलोमीटर व १० किलोमीटर अशा तीन प्रकारांमध्ये आयोजित करण्यात आली होती. श्री राऊत व शिंदे यांनी २१ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होत २ तास ४८ मिनिटांमध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेत देशभरातून १३५०० लोकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ५ वर्षाच्या मुलापासून ९६ वयाच्या ज्येष्ठा पर्यंत लोकांनी सहभाग घेतला होता.