राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक कमावत शिवम बनला नॅशनल चॅम्पियन!
करमाळा (दि.१२) – करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या शिवम राजेंद्र चिखले या खेळाडूने राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त करून नॅशनल चॅम्पियन बनला आहे.
६८ वी राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा गुजरात मधील मरीदा (ता.नाडीयाद,जि. खेडा) या ठिकाणी ११ ते १२ नोव्हेंबर २०२४ दरम्यान पार पडल्या. या स्पर्धा स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फेडरेशन ऑफ इंडिया द्वारा संचालित आयोजित करण्यात आलेल्या होत्या.
या ठिकाणी १७ वर्षे वयोगट मुले रिकव्ह या प्रकारांमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील खेळाडू शिवम राजेंद्र चिखले याने महाराष्ट्र संघाकडून खेळून टीम या प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच संपूर्ण स्पर्धेमध्ये ७२० पैकी ६७० गुणांक प्राप्त करून देशामध्ये सहावा क्रमांक प्राप्त केला. शुभम याने सुवर्णपदक प्राप्त केल्याने तो नॅशनल चॅम्पियन झाला. त्याची आता खेलो इंडिया या स्पर्धेमध्ये निवड झाली.
रावगाव (ता. करमाळा) हे शिवमचे गाव असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये देखील फार मोठे टॅलेंट असते हे शिवमने सिद्ध करून दाखवले आहे. शिवमला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.राम काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . या यशस्वी खेळाडूने करमाळा तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकावले आहे .अशा महत्वाच्या कामगिरीबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. शिवमचे रावगाव परिसरातून तसेच करमाळा तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.