वरकुटे येथील वैष्णवीची धनुर्विद्या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
करमाळा : वरकुटे(ता.करमाळा) येथील वैष्णवी कुमार पाटील हिची धनुर्विद्या (आर्चरी) या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. काल (दि.९) अकलूज येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) या खेळात सतरा वर्ष वयोगटाखालील गटात तिने उत्कृष्ट कामगिरी केली. इंडियन राउंड प्रकारात तिने वैयक्तिक एक ब्राँझ पदक व सांघिक सुवर्णपदक मिळवून तिने राष्ट्रीय स्पर्धेसाठी जागा मिळविली आहे.
वैष्णवी सध्या करमाळा येथील गुरुकुल माध्यमिक विद्यालय, देवीचामाळ येथे नववीच्या वर्गात शिकत आहे. ती मोडनिंब (ता. माढा) या ठिकाणी आर्चरी या खेळाचा सराव करत आहे. तिला विठ्ठल भालेराव यांचे मार्गदर्शन मिळत आहे. तिचे वडील करमाळा येथील एकलव्य आश्रम शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
या अगोदर वैष्णवीने पुणे येथे झालेल्या शालेय विभागीय आर्चरी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रवेश मिळवलेला होता. यापूर्वीही गोवा येथे झालेल्या जुनियर नॅशनल स्पर्धेमध्ये तिला वैयक्तिक तीन रौप्य पदके व एक सांघिक सुवर्णपदक मिळवलेले आहे.
या यशाबद्दल करमाळा तालुक्यातुन वैष्णवीचे व तिच्या पालकांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.