कंदरच्या मल्लांचे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश

कंदर (संदीप कांबळे): नेवासा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कंदर (ता.करमाळा) येथील छत्रपती संभाजी राजे कुस्ती संकुलच्या मल्लांनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्यभरात आपली छाप उमटवली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर, श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुकिंदपूर (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) यांच्या संयुक्त विद्यमाने व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

- या स्पर्धेत पै. रणवीर विकास शिंदे (74 किलो वजन गट) याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवून दिल्ली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.
- पै. संकेत सतीश शिंदे (86 किलो) याची नांदेड विद्यापीठातून चंदीगड (पंजाब) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
- तसेच पै. गौरव जालिंदर सौताडे (92 किलो) याची पुणे विद्यापीठातून चंदीगड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
- याशिवाय पै. यशराज जयराम जाधव आणि पै. कु. सलोनी दयानंद बैरागी या दोघांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या सर्व मल्लांना छत्रपती संभाजी राजे कुस्ती संकुलचे संस्थापक अध्यक्ष पै. उमेश इंगळे, तसेच कुस्ती मार्गदर्शक पै. अण्णा नायकवडी आणि पै. सुनील ढाका यांचे मार्गदर्शन लाभले. कंदर गावातील मल्लांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.




 
                       
                      