"शहीदांच्या बलिदानाचे ऋण फुलांनी नव्हे, जबाबदार नागरिकत्वाने फेडावे" – प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे - Saptahik Sandesh

“शहीदांच्या बलिदानाचे ऋण फुलांनी नव्हे, जबाबदार नागरिकत्वाने फेडावे” – प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे

0

“शहीदांच्या बलिदानाचे ऋण फुलांनी नव्हे, जबाबदार नागरिकत्वाने फेडावे” – प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे करमाळ्यात २७…

करमाळ्यात २७ वा कारगिल विजय दिवस उत्साहात; कारगिल योद्धे, शिक्षक, युवा अभियंते व एनसीसी कॅडेट्सचा गौरव

करमाळा /संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ, करमाळा आणि यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यशकल्याणी सेवाभवन येथे २७ वा कारगिल विजय दिवस देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कारगिल युद्धातील शहीद जवानांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले तसेच सैनिकी, शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक आणि युवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवनगौरव पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी-साहित्यिक तथा प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, “कारगिलच्या रणभूमीवर भारतीय जवानांनी केवळ शत्रूच्या चौक्या जिंकल्या नाहीत, तर भारताच्या स्वाभिमानाची उंची जगाला दाखवून दिली. शहीदांना पुष्पहार अर्पण करणे ही श्रद्धा असली, तरी त्यांनी जपलेल्या राष्ट्रासाठी प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि जबाबदार नागरिक म्हणून जगणे हीच खरी कृतज्ञता आहे. शहीदांच्या बलिदानाचे ऋण फुलांनी नव्हे, तर जबाबदार नागरिकत्वाने फेडले पाहिजे.”

प्रास्ताविकात आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अक्रूर शंकरराव शिंदे यांनी कारगिल युद्धातील सैनिकांच्या पराक्रमाचा आढावा घेतला. सैनिकांच्या कुटुंबांप्रती समाजाने संवेदनशील राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्वागतपर भाषणात प्रा. करे-पाटील यांनी कारगिल युद्धाचा इतिहास हा धैर्य, राष्ट्रनिष्ठा आणि सैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाचा अमर अध्याय असल्याचे सांगत सैनिकांचा सन्मान हा समाजाच्या संस्कारांचा अविभाज्य भाग व्हावा, असे प्रतिपादन केले.

यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाबद्दल ‘कारगिल योद्धा जीवनगौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ देवस्थानचे विश्वस्त भारतभाऊ शिंदे, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड. डॉ.बाबुराव हिरडे, स्वातंत्र्यसैनिक परिवाराचे प्रतिनिधी तथा पत्रकार विवेक येवले, सहाय्यक कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले आणि सोलापूर जिल्हा इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळकृष्ण लावंड यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी शहीद मेजर अमोल निलंगे यांचे वडील अरविंद निलंगे, शहीद जवान नवनाथ गात यांच्या वीरमाता गुंफाबाई गात, शहीद मेजर आप्पासाहेब काटे यांच्या मातोश्री, प्रा. कल्याणराव साळुंके, गणेश लोकरे, अॅड. दत्तात्रय सोनावणे, प्रा. जयेश पवार आणि अभियंता अतुल दाभाडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

समारंभात करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे, टीव्ही-९चे पत्रकार शितलकुमार मोटे, गायक प्रवीण अवचर आणि पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगाव येथील शिक्षक प्रताप बरडे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेले माजी सैनिक पांडुरंग साळवे आणि बाळासाहेब काकडे यांचा ‘कारगिल योद्धा’ म्हणून विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या सन्मानावेळी उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अमेरिकेत अभियंता म्हणून कार्यरत हर्षद शिंदे आणि एमईएसबीचे अभियंता अमृत महामुनी यांना विशेष युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच गौरव आकाश पवार, शुभम भरतरी वळेकर, संकेत संभाजी गरड आणि अभिषेक गणेश करकुटे यांना ‘बेस्ट एनसीसी कॅडेट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमात कंदर येथील युवा निर्माण अकॅडमीला यशकल्याणी संस्थेच्या वतीने स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला.

प्रसिद्ध गायक प्रवीण अवचर आणि त्यांच्या म्युझिक कंपनीने सादर केलेल्या देशभक्तिपर गीतांनी संपूर्ण सभागृह राष्ट्रभक्तीच्या वातावरणाने भारावून गेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विष्णू शिंदे, सचिन नवले आणि किरण ढेरे यांनी केले, तर आभार योद्धा करिअर अकॅडमीचे अध्यक्ष सुभेदार मेजर विलासराव नाईकनवरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!