नफ्याचा विचार न करता गुढीपाडव्याची परंपरा जपण्यासाठी हारगाठीचा व्यवसाय सुरू
केम/संजय जाधव
गुढी पाडव्याला साखरेच्या हारगाठीला विशेष मान असतो. वाढत्या महागाईमुळे या व्यवसायाला म्हणावा तसा नफा राहिला नाही तरी पण आपल्या व्यवसायाची व गुढीपाडव्याची परंपरा टिकविण्यासाठी प्रदिप शिंदे यांचा हारगाठी बनविण्याचा व्यवसाय सुरू आहे.

होळी सणानंतर खऱ्या अर्थाने वेध लागते ते गुढीपाडवा सणाचे. मराठी नववर्षाची सुरुवात या दिवसापासून केली जाते. केम येथील प्रदिप शिंदे हे आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन गेल्या वीस वर्षांपासून साखरेची हारगाठी तयार करण्याचा व्यवसाय करत आहेत.या व्यवसायासाठी मनुष्य बळाची गरज लागते. साधारणपणे या व्यवसायात दहा महिला लागतात. वाढत्या महागाईमुळे या व्यवसायाला म्हणावा तसा नफा राहिला नाही तरी पण आपल्या व्यवसायाची व गुढी पाडव्याची परंपरा टिकविण्यासाठी त्यांचा व्यवसाय सुरू आहे.
या व्यवसायासाठी साखर महत्त्वाचा घटक आहे. एक क्विंटल साखरेपासून साधारण ९० कि. हार तयार होतो. दिवसाला ३०० ते ४०० किलो हार होतात. या हाराला केम परिसरातून चांगली मागणी आहे. संत सावता माळी महिला बचत गटातील महिला हार तयार करण्याचे काम करतात. साधारण एका महिलेला ३५० रू. चा रोजगार दिवसाला यामधून मिळतो. सध्या या व्यवसायातुन दहा महिलांना रोजगार उपलब्ध होत आहे.
सध्या केम येथे दुर्गळे कुटुंब व आम्ही या व्यवसायाची परंपरा टिकवून ठेवली आहे, अशी माहिती प्रदिप शिंदे यांनी दिली.
