पत्नीला नेण्यास आलेल्या जावयाची सासरवाडीतून झाली पिटाई

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : पत्नीला नेण्यासाठी आलेल्या जावयाला सासरवाडीच्या लोकांनी काठी, कोयता व लाथाबुक्क्यांनी मारून धमकी देऊन हाकलून लावले आहे. हा प्रकार ७ मे ला सायंकाळी पाच वाजता वडशिवणे (ता. करमाळा) येथे घडला आहे. यात रविंद्र प्रकाश ढाकळे (वय ३२, रा. दहिवली, ता. माढा) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझी पत्नी योगिता ही वडशिवणे येथील साहेबराव लोंढे यांची मुलगी आहे. ती माझ्याबरोबर वाद करून तिच्या माहेरी गेली होती. ६ मे २०२३ ला माझ्या पत्नीने मला फोन करून उद्या वडशिवणे येथे येऊन घेऊन जावे असे सांगितले. त्यानुसार मी ७ मे ला सायंकाळी पाच वाजता वडशिवणे येथील माझ्या सासऱ्याच्या घरासमोर गेलो असता, त्यावेळी माझे सासरे साहेबराव लोंढे तसेच मेहुणीचा मुलगा आण्णा मोहिते व माझी सासू आले व त्यावेळी सासऱ्याने मला काठीने मारहाण केली तर आण्णा मोहिते यांनी ऊस तोडणीच्या कोयत्याने डोक्यात मारून जखमी केले. तर सासू तारामती लोंढे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी माझी पत्नी योगिता हिने त्यांच्या तावडीतून सुटका केली. या प्रकरणी पोलीसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.