करमाळा शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन करुन नवीन विस्तारित पाणीपुरवठा योजना राबविण्यात यावी – भाजप पदाधिकाऱ्यांकडून निवेदन

करमाळा /संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरासाठी कार्यरत असणारी – पाणी पुरवठा योजना ही सन 1991-92 या वर्षी कार्यन्वित झालेली आहे. यानंतर गेली 30 वर्षामध्ये शहराचा विस्तार हद्दवाढ मोठ्या प्रमाणात झालेला आहे, त्यामुळे करमाळा शहरासाठी विस्तारित पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या वतीने राबविण्यात यावी अशा मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय सोलापूर यांना भाजपचे तालुका सरचिटणीस श्याम सिंधी व संजय गांधी निराधार योजनेचे नरेंद्रसिंह ठाकुर यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, करमाळा शहराच्या लोकसंख्ये मध्येही मोठी वाढ झालेली आहे, सन 1991-92 ची पाणी पुरवठा योजनेला 30 वर्षापेक्षा जास्त कार्यकाल झालेला आहे. ती योजना जवळपास कालबाहय होत आहे. तरी केंद्र सरकारच्या जलामृत योजने अंतर्गत नवीन विस्तारीत पुढील 50 वर्षाचे नियोजन करुन वाढती लोकसंख्या व विस्तारीत करमाळा शहरासाठी 24 तास पाणी पुरवठा व्हावा या हेतुने अद्यावत तांत्रिक बाबीसह पाणी पुरवठा योजना राबवावी, या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी करमाळा नगरपरिषद यांनाही देण्यात आले आहे.
