जिथे तलवारीची लढाई झाली तिथे फुलांची उधळण!
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या पुढाकाराने व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे नेतृत्वाखाली तसेच आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील व बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांचेसह अन्य राजकीय पक्ष व गटातटाच्या सहकार्याने बिनविरोध झाली आहे. या निवडीने
जगताप गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, बाजार समितीवर माजी आमदार जयवंतराव जगताप गटाची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे.
जिथे तलवारीची लढाई झाली तिथे फुलांची उधळण! – बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे हा एक नवा इतिहास ठरणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीचा जुना इतिहास पाहता सतत वादावादी झालेली आहे. कधी समोरासमोर तर कधी न्यायालयात संघर्ष झाला आहे. दिवाणी न्यायालयापासून सहकारी न्यायालयापर्यंत तर जिल्हा सहकारी कोर्टापासून ते उच्च न्यायालयापर्यंत संघर्ष झालेले आहेत. जिथे तलवारीची लढाई झाली तिथे फुलांची उधळण होणं म्हणजे नव्या पिढीसाठी एक आदर्शाचा मार्ग दाखवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत यापूर्वी मोहिते-पाटील यांचे पाठबळाने विरोधकांनी निवडणुकीत आव्हान उभे केले होते. याउलट या निवडणुकीत त्यांच्या हस्तक्षेपामुळेच ही निवडणूक बिनविरोध झाली आहे हे विशेष!
करमाळा बाजार समितीच्या स्थापने पासून काही अपवाद वगळता जगताप गटाचेच वर्चस्व होते. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सलग २९ वर्षे बाजार समितीचे सभापती पदी कामकाज पाहीले आहे. मागील निवडणूकीत सभापती वेळी झालेल्या बंडखोरीमुळे हाताशी आलेली सत्ता जगताप गटाने गमावली होती. ५ वर्षांच्या ब्रेकनंतर करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार जयवंतराव जगताप गटाची पुन्हा एकदा सत्ता आली आहे.
बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणार म्हणून सा. कमलाभवानी संदेशने २२ सप्टेंबरच्या अंकात भाकीत वर्तविले होते. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मोहिते-पाटील यांची शिष्टाई कामी आली आहे. या निवडणुकीसाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी बिनशर्त
पाठींबा दिल्याने त्यांच्या सूचनेनुसार त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी बिनशर्त उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. शेवटी-शेवटी सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांनी निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु त्यानंतर मात्र त्यांनी आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या विनंतीस मान देऊन संस्थेच्या हितासाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मोहिते-पाटील यांनी माजी आमदार नारायण पाटील व बागल गटाचे नेते दिग्विजय बागल, माजी आमदार जयवंतराव जगताप यांचेबरोबर बैठक घेऊन समझोता घडवून आणला. पाटील गटाला दोन व बागल गटाला दोन जागा देण्याचे ठरले. आमदार संजयमामा शिंदे यांनी बिनशर्त पाठींबा दिल्यामुळे त्यांच्या गटाला कोणतीही जागा मिळालेली नाही.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अतुल खुपसे-पाटील व भाजपच्या काही समर्थक उमेदवारांचे अर्ज राहिले होते. शेवटी शेवटी त्यांनीही अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. बाजार समितीची निवडणूक ही करमाळा तालुक्याच्या अन्य निवडणुकापेक्षा आत्तापर्यंत जास्त गाजलेली निवडणूक होती. परंतु यावेळेस बिनविरोध निवडणूक झाल्याने वेगळा इतिहास घडला आहे. आत्तापर्यंतच्या बाजार समितीच्या इतिहासात अनेक निवडणूकात वादावादी किंवा न्यायालयीन संघर्ष झालेला आहे. तसेच तलवारीची लढाई होऊनही ही निवडणूक गाजल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध म्हणजे तरूण पिढीसाठी एक आदर्शाचा मार्ग असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आत्तापर्यंतच्या निवडणुकीत मोहिते-पाटील यांच्या पाठबळामुळेच आव्हान उभे झाले होते. आज मात्र त्यांच्याच हस्तक्षेपामुळे ही निवडणूक बिनविरोध होत आहे व संपूर्ण राज्यात आदर्श असे उदाहरण आहे.
या सर्व विजयी उमेदवारांचे माजी आमदार जयवंतराव जगताप, नारायण पाटील, दिग्विजय बागल यांनी अभिनंदन केले आहे.या निवडीनंतर करमाळा शहरात जगताप गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजीने आनंद व्यक्त केला आहे.
२२ सप्टेंबर च्या जगताप-पाटील-बागल यांच्या बैठकीनंतर ही निवडणूक बिनविरोध होणार याची औपचारिकता बाकी होती. अखेरच्या क्षणी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी (२६ सप्टेंबरला) सर्व गटातील नाराज उमेदवारांना घेऊन जनशक्ती संघटना उर्वरित पंधरा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे-पाटील यांनी जाहीर केले होते परंतु शेवटी त्यांची मनधरणी झाल्यानंतर त्यांनी यातून माघार घेतली व निवडणूक बिनविरोध झाली.
- करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती नूतन संचालक मंडळ
- सहकारी संस्था मतदारसंघ – सर्वसाधारण : – १) जयवंतराव जगताप, २ )शंभूराजे जगताप ३ )जनार्धन नलवडे, ४) महादेव कामटे ५ ) तात्यासाहेब शिंदे , ६ ) रामदास गुंडगीरे ७) सागर दौंड
- सहकारी संस्था मतदारसंघ – ईतर मागासवर्गीय (ओबीसी) – शिवाजी राखुंडे
- सहकारी संस्था मतदारसंघ – विमुक्त जाती भटक्या जमाती (एनटी) – नागनाथ लकडे
- सहकारी संस्था मतदारसंघ – महिला – १) सौ .शैलजा मेहेर २) सौ . साधना पवार
- ग्रामपंचायत – सर्वसाधारण : – १) नवनाथ झोळ २) काशीनाथ काकडे
- ग्रामपंचायत – अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती : बाळू चंद्रकांत पवार
- ग्रामपंचायत – आर्थिक दुर्बल घटक – कुलदीप विश्वास पाटील
- व्यापारी मतदारसंघ प्रतिनिधी – १) परेशकुमार दोशी २) मनोजकुमार पितळे
- हमाल /तोलार प्रतिनिधी – वालचंद रोडगे
करमाळा बाजार समितीच्या २०२३ च्या निवडणूकीसाठी एकूण १५४ वैध अर्ज प्राप्त झाले होते. एकूण १८ सदस्यांच्या निवडी साठी ही निवडणूक होती. त्यापैकी व्यापारी गटातुन २ जागा मनोज पितळे व परेशकुमार दोशी असे २ संचालक आधीच बिनविरोध निवडले होते तसेच हमाल-तोलार गटामध्ये वालचंद रोडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने तेही बिनविरोध निवडले होते. १८ पैकी ३ जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या. १५ जागेंसाठी निवडणूक होण्याची शक्यता होती.
- बिनविरोध निवडलेल्या उमेदवारांची गटानुसार नावे खालीलप्रमाणे..
- जगताप गट : माजी आमदार जयवंतराव जगताप, शंभुराजे जयवंतराव जगताप, जनार्दन ज्ञानदेव नलवडे, रामदास विलास गुंडगिरे, तात्यासाहेब चंद्रभान शिंदे, महादेव गोविंद कामटे,नागनाथ गणपत लकडे, मनोज कांतीलाल पितळे, परेशकुमार रतनचंद दोशी, सागर भगवान दोंड, शैलेजा बबन मेहेर, साधना आण्णासाहेब पवार, शिवाजी ज्ञानदेव राखुंडे,
- माजी आमदार नारायण पाटील गट : नवनाथ मधुकर झोळ, बाळू चंद्रकांत पवार
- बागल गट : काशिनाथ भिमराव काकडे, कुलदीप विश्वास पाटील
- सावंत गट : वालचंद विठ्ठल रोडगे
हे ही वाचा – अग्रलेख – पुन्हा एकदा बाजार समिती