पुन्हा एकदा बाजार समिती! - Saptahik Sandesh

पुन्हा एकदा बाजार समिती!

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. ८ सप्टेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने सर्व गटाच्या प्रतिनिधीसह
इचछुकांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सन २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत व या निवडणुकीत फरक आहे. मागील निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला होता तर या निवडणुकीत सहकारी संस्था प्रतिनिधी व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचे अधिकार आहेत. त्यामुळे मर्यादीत मतदारांच्या आखाड्यातील ही निवडणूक आहे.

आज (दि.१२ सप्टेंबर) च्या माहिती नुसार करमाळा बाजार समितीच्या २०२३ च्या निवडणूकी साठी एकूण १६१ पैकी १५४ अर्ज मंजूर झाले आहेत. एकूण १८ सदस्यांच्या निवडी साठी ही निवडणूक असून त्यापैकी व्यापारी गटासाठी २ जागा आहेत. त्यासाठी मनोज पितळे व परेशकुमार दोशी असे २ अर्ज आले आहेत. तसेच हमाल-तोलार गटामध्ये वालचंद रोडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने या ३ जागा बिनविरोध होणार असून औपचारिकता बाकी आहे. उर्वरित १५ जागांसाठी पुढील महिन्यात ८ ऑक्टोबरला मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी लगेच ९ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे.

मागील निवडणुकीत झालेले मतदान पहाता व या ल निवडणुकीतील मतदान आकडेवारी पाहता हा फरक सहज समजेल. सन २०१८ मध्ये निवडणुकीत पडलेले मतदान १५ गणातील तीनही गटाच्या उमेदवारांची बेरीज पुढीलप्रमाणे.. पाटील-जगताप युतीला एकूण मतदान- १७८४२, शिंदे-भाजपा युतीला मिळालेले मतदान १३३०५ तर बागल गटाला झालेले मतदान १९९७१ मते म्हणजे तिन्ही गटाला मिळून ५१,११८ मतदान झाले होते. यावेळी सहकारी संस्था मतदार संघात ११ जागा असून त्यासाठी ११३ संस्थाचे १४२४ मतदान, ग्रामपंचायत मतदार संघातील चार जागेसाठी-१०५ ग्रामपंचायतीचे-८०७ मतदान आहे. याशिवाय व्यापारी मतदार संघात -२१४ मतदार आहे. हमाल-तोलार मतदार संघात – १३० मतदान आहे.

सन २०१८ ची एकमेव निवडणूक ही शेतकरी मतदारातून झालेली होती. मागील निवडणूक ही तिरंगी झाली होती. तत्कालीन आमदार नारायण पाटील व माजी आमदार जयवंतराव जगताप यांची युती होती, तसेच तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व विद्यमान आमदार संजयमामा शिंदे व भाजपा यांच्यात युती होती तर बागल गट स्वतंत्र लढला होता. मागील निवडणूक ही जगताप गटाच्या दृष्टीने प्रतिष्ठेची होती. त्यामुळे ही निवडणुक जिंकायचीच असे ठरवून जगताप-पाटील गटाची युती झाली होती. दोन वजनदार व्यक्तींच्या युतीमुळे पाटील-जगताप गट सहज पूर्ण बहुमत मिळविणार; अशी बहुतेकांना खात्री होती. अशी खात्री वाटण्याचे कारण म्हणजे तत्कालीन शिंदे गट हा बागल गटाचे मतदान घेणार आणि त्याचा फायदा पाटील-जगताप युतीला होणार, हे एक कारण होते. एवढेच नाहीतर शिंदे-भाजपा गट व आमदार पाटील- जगताप गट या दोन गटांनी जातेगाव आणि वांगी या दोन गटात केलेले साठेलोटे महत्वाचे होते. शिंदे गटाचे जातेगाव गटातील उमेदवार सुजित बागल यांच्या विरुध्द जगताप-पाटील गटाचा उमेदवार नव्हता तर वांगी गटात जगताप-पाटील युतीचे दस्तुरखुद्द जयवंतराव जगताप हे उभे होते, तिथे शिंदे गटाने उमेदवार उभा केला नव्हता. या स्थितीत बागल गटाने शेतकरी मतदार संघातून १५ जागेपैकी आठ जागा जिंकलेल्या होत्या तर जगताप-पाटील युतीने सहा जागा जिंकल्या व शिंदे गटाने एक जागा जिंकली होती. सहा मध्ये श्री. जगताप हे वांगी व केम अशा दोन गटातून विजयी झाले होते. त्यामुळे एका जागेचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे सभापती निवडीवेळी मोठा गहजब झाला होता.

जगताप गटाकडे व्यापारी मतदार संघातील दोन संचालक व शेतकरी गटातील पाच संचालक असे सात सदस्य होते. त्यांना बहुमतासाठी दोन संचालकांचे पाठबळ हवे होते.
दुसऱ्या बाजूला बागल गटाचे आठ संचालक निवडले होते. त्यांना बहुमतासाठी एका संचालकाची गरज होती. सभापती निवडीच्या आदल्या रात्री जगताप-पाटील युतीने शिंदे गटाबरोबर युती करून चंद्रकांत सरडे यांना सभापती करण्याचे ठरवले. अंतिम निर्णय झाला आणि पहाटे अडीच वाजता पाटील गटाचे संचालक प्रा.शिवाजीराव बंडगर यांनी अचानक जगताप-पाटील युतीला सोडून बागल गटात प्रवेश केला. त्यामुळे एकाच वेळी तीन्ही गटाला धक्का बसला आणि बागल गटाचा सभापती झाला.

सभापती पदाची निवडणूक ३ ऑक्टोबर २०१८ रोजी झाली. सभापती निवडीच्या वेळी जोरदार धुमचक्री झाली. त्यावेळी झालेल्या मारामारीचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे माजी आमदार जयवंतराव जगताप यांना काही काळ अज्ञातवासात रहावे लागले. एवढेच नव्हेतर त्यांना अटकपूर्व जामीन न मिळाल्याने अटकही व्हावी लागली होती.

थोडक्यात मागील निवडणुकीचा इतिहासही फारसा चांगला नाही. यापुर्वीसुध्दा सन २००० साली झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत अशीच जोरदार मारामरी
जेऊर येथे मतदान केंद्रा जवळ झाली होती. त्यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे बाजार समिती मधील राजकारण संपुष्टात आणण्याचे धोरण माजी मंत्री कै.दिगंबरराव बागल यांचे होते. त्यामुळे कै. बागल यांनी त्यावेळी सोबतीला गिरधरदास देवी, माजी आमदार नारायण पाटील यांच्याबरोबर युती केली होती. त्यानुसार कै. बागल व श्री. पाटील यांनी त्या निवडणुकीत मोठा जोर लावला होता. दुसऱ्या बाजूला श्री.जगताप, आदिनाथचे माजी संचालक कै. सुभाषराव सावंत, दशरथराव कांबळे यांना बरोबर घेऊन जोर लावलेला होता. खरंतर त्या निवडणुकीत बागल गट सर्वच बाबतीत सत्ताधारी गटाच्या पुढे गेला होता. प्रचारातील आघाडी, मतदारांचा पाठींबा आणि राबवलेले नियोजन व्यवस्थित होते. पण ऐन मतदानादिवशी जेऊर येथील मतदान केंद्रावर किरकोळ कारणावरून मारामारी झाली होती. त्यात माजी आमदार जगताप, श्री. कांबळे, श्री. सावंत, दिगंबर रासकर आदी जणांवर तलवारीचा हल्ला झाला होता. या हल्ल्याची माहिती हा.. हा.. म्हणता तालुकाभर पसरली. त्यानंतर बागल-पाटील गटाबाबत मतदारात असलेली सहानुभूती संपली आणि ही सहानुभूती जगताप गटाकडे गेली. त्यामुळे बागल-पाटील यांच्या हातातोंडाशी आलेले यश त्यांच्याच कृत्याने त्यांना गमवावे लागले व जगताप गटाने शानदार विजय मिळवला. एवढेच नव्हेतर जेऊर येथे झालेल्या हल्ल्यात स्वत: जयवंतराव जगताप हे सुध्दा गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या सोबत असलेले दशरथ कांबळे व दिगंबर रासकर हे जास्त गंभीर जखमी झाले होते. श्री.सावंत व इतरांना किरकोळ दुखापत झाली होती. श्री. जगताप व त्यांच्या समर्थकांना हल्ल्यानंतर उपचारासाठी कुटीर रुग्णालयात आणले होते.

त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी हजारो जगताप समर्थक कुटीर रुग्णालयात आले. श्री. जगताप यांना गंभीर स्थितीत पाहिल्यानंतर त्यांचे समर्थक चिडले व त्यांनी तत्कालीन पंचायत समितीचे सभापती नारायण पाटील यांचे सभापती भवनवर हल्ला चढवला. त्यानंतर गिरधरदास देवी, अशोक गायकवाड, विजय पवार, श्रेणिकशेठ खाटेर यांचे दुकानावर व त्यानंतर तत्कालीनआमदार दिगंबरराव बागल यांच्या बंगल्यावर हल्ले केले. जाळपोळ, फोडतोड झाली. काहींनी लुटालूट केली. या प्रकरणी सहा गुन्हे दाखल झाले. एका बाजूला जेऊर हल्लाप्रकरणी नारायण पाटील यांचेबरोबर सुलेमान मुल्ला, राजेंद्र पाटील, सतीश कानगुडे, बापू शेंबडे, नागनाथ गायकवाड, राजेंद्र कांबळे, अंबादास पवार, संजय निमगिरे यांना टेंभूर्णीतून ताब्यात घेतले होते. तर जगताप समर्थक सुभाष सावंत यांच्यासह बलभिम कसाब, राजेंद्र कसाब, शेख फरीद पिंजारी, शफी पिंजारी, अंकुश वाघमोडे, सतीश शिर्के यांना ताब्यात घेतले. याच दरम्यान दंगलीत सहभागी झालेले जवळपास शंभर जण फरार झाले होते.अशा प्रकारे बाजार समितीच्या निवडणुकीत सतत वादावादी झालेली आहे.

काही वाद समक्ष तर काही वाद न्यायालयात झाले आहेत. अशा स्थितीत यावर्षीची निवडणूक लागलेली आहे. सध्या दुष्काळी स्थिती आहे. शेतकरी उदासीन आहे. बाजार समितीची परिस्थीती सुधारत आहे. अशाच कालावधीत पुन्हा निवडणुकीचा खर्च व प्रचारासाठी होणारा खर्च, मतदार व नेते यांच्यातील वाढता तणाव पाहाता, नेते मंडळीनी ही निवडणूक बिनविरोध करणे गरजेचे आहे. सर्व गटाच्या प्रतिनिधींना संधी देऊन चेअरमन व व्हा. चेअरमन पदे फिरती ठेवावीत, ज्यामुळे सर्वांना संधी मिळेली व राज्यात करमाळा पॅटर्न गाजेल. त्यामुळे निवडणूक लढवण्यापेक्षा बिनविरोधच होईल यावरच सर्व नेत्यांनी भर देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!