विधवा महिलेच्या हातून गुढी उभारून तिचा सन्मान करण्यात यावा – प्रमोद झिंजाडे

करमाळा(दि.२९) : गुढी पाडव्याला विधवा महिलेच्या हातून गुढी उभारून तिचा सन्मान करण्यात यावा असे आवाहन करमाळ्यातील महात्मा फुले समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष व विधवा महिला सन्मान योजनेचे जनक प्रमोद झिंजाडे यांनी केले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की समाजामध्ये अजूनही विधवा महिलांना पतीच्या निधनानंतर कुठल्याही शुभ कार्यामध्ये, धार्मिक सण,उत्सवांमध्ये सहभागी करून घेतले जात नाही. तिला अशा सण उत्सवात सहभागी करणे अशुभ मानले जाते. मरेपर्यंत तिला वाळीत टाकले जाते. या अनिष्ट रूढी परंपरे मधून समाजाने बाहेर पडणे ही काळाची गरज आहे. वास्तविक विधवा महिला या स्वतःहून विविध सणवारामध्ये सहभागी होत नाहीत. त्यामुळे इतर लोकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी विधवांना अशा सर्व सणांमध्ये सहभागी करून त्यांचा सन्मान करावा.

विधवा महिलांना पांढऱ्या पायाची,पांढऱ्या कपाळाची म्हणणे किंवा इतर गोष्टींनी हिनवणे हे आता कायद्याने गुन्हा ठरत आहे. विधवांना स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार असून त्यांना पुनर्विवाह करण्याचा देखील अधिकार कायद्याने दिलेला असल्याचे श्री झिंजाडे यांनी सांगितले..




