सफारी – पिकअप अपघात प्रकरणी पिकअप चालकावर गुन्हा दाखल

करमाळा(दि.२८) : सफारी गाडीला जोराची धडक देऊन गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी पिकअप चालकावर करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी करमाळा येथील लिंबाजी अज्ञान पेठे (वय- 59) यांनी फिर्याद दिली असून पिकअप चालक नितीन भरत आरणे, रा. कोंढेज, ता. करमाळा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की 26 मार्च रोजी सकाळी सव्वा दहा च्या सुमारास करमाळा टेंभुर्णी रोडवर असलेल्या बागल पेट्रोल पंप येथे आमच्या सफारी गाडीमध्ये डिझेल भरण्यासाठी गेलो होतो डिझेल भरून पेट्रोल पंपातून बाहेर येत असताना मी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहून गाडी रोडवर घेतली होती. त्यावेळी करमाळा शहराचे बाजूने एक पांढ-या रंगाचे पिकअप अतिशय वेगात आला व त्याने मी चालवत असलेल्या टाटा सफारी एम एच 45 ए यु 5959 पांढरे रंगाची या गाडीस जोराची धडक दिली आहे. सदरचे धडक दिल्यानंतर माझी टाटा सफारी गाडीने एक पलटी घेवून गाडी पूर्णपणे उलटी झाली होती. त्यावेळी रस्त्यावर असणारे लोकांनी मला गाडीतून बाहेर काढले असून अपघातामध्ये मला कोणत्याही प्रकारची जखम झालेली नाही. मी गाडीतून बाहेर आल्यानंतर पाहिले असता मला धडक देणारे गाडी महिंद्रा पिकअप पांढ-या रंगाची असून तीचा क्र एम एच 45 टी 3493 असा होता. अपघातामध्ये माझे गाडीचे समोरील काच, पाठीमागील सर्व काचा, शो, बोनेट, टप, इंजिन, लाईट, दरवाजे व इतर उपकरणांचे तूटफूट होवून नुकसान झाले आहे व पिकअपचे देखील तूटफुट होवून नुकसान झाले आहे.

मोटार अधिनियम १९८८ अंतर्गत कलम १८४, भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम २८१ भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत ३२४(४) आदी कलमांतर्ग पिकअप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक पोपट बबन टिळेकर हे करत आहेत.




