निंभोरे येथे पकडला भारतीय कोब्रा नाग – ‘या’ कारणांसाठी सापाला न मारण्याचे केले सर्पमित्राने आवाहन
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – आज (दि.१३) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास निंभोरे (ता.करमाळा) येथील रवींद्र वळेकर यांच्या घरात कोब्रा नाग दिसून आला.त्यांनी तातडीने केम येथील सर्प मित्र अतुल चंद्रकांत ढावरे यांना बोलावून घेतले. ढावरे यांनी आपले कौशल्य दाखवत कोब्रा नागाला पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले. अत्यंत विषारी सापाच्या यादीत स्थान असलेल्या कोब्राला अखेर पकडल्याने वळेकर कुटुंब व परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
सकाळी वळेकर यांच्या टॉयलेट बाथरूममध्ये हा भारतीय कोब्रा नाग दिसून आला होता. त्यानंतर वळेकर कुटुंबीयांनी दार लावून सर्पमित्र ढावरे यांना बोलावले. सर्पमित्र ढावरे आल्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी विविध प्रयत्न केल्यानंतर तो बाहेर आला. शेवटी आपले कौशल्य वापरून त्यांनी प्लास्टिकच्या बरणीत कोब्राला बंद केले व त्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात सोडले. हा साप पकडताना ढावरे यांना मधुकर जनार्दन अवघडे यांनी मदत केली. यावेळी राज पठाण,लक्ष्मण वळेकर,दत्ता वळेकर,सुजित काळदाते, पिनु वळेकर, भैरु सांगडे,सोनू गुरव,दादा गुरव, पवि वळेकर, नाथा शिंदे,ईश्वर मस्के आदी ग्रामस्थ जमले होते.
आपल्या आसपास दिसणाऱ्या सापांमध्ये शक्यतो बिनविषारी सापांची संख्या जास्त असते. त्यामुळे लोकांनी साप दिसताच घाबरून जाऊन त्याला मारण्यास धावू नये. शक्यतो साप हे स्वतःहून माणसाला चावण्यासाठी येत नसतात. जर माणसाने त्याच्यासोबत झटापट करण्याचा प्रयत्न केला तर ते स्वसंरक्षणासाठी दंश करत असतात.त्यामुळे जर कुणाला साप दिसला तर त्यांनी सापाला न मारता आपल्या परिसरातील सर्पमित्राला बोलावून त्यांच्या मार्फत सापाला पकडण्यास सहकार्य करावे. तसेच येणाऱ्या सर्पमित्राला योग्य ते मानधन द्यावे.
– सर्पमित्र अतुल ढावरे, केम मो. 7387814784
साप/नाग मारले तर अन्न साखळीवर परिणाम साप हे उंदीर, घुशी, सरडे, पाली, बेडूक इ प्राण्यांना खात असून निसर्गातील सजीवांचे संतुलन ठेवण्याचे काम केले जाते. घुशी, उंदीर हे शेतीचे जे नुकसान करू शकतात ते रोखण्याचे काम साप करतात. त्यामुळे सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून देखील संबोधतात. साप जर मारत गेलो तर त्याचा निसर्गाच्या अन्न साखळी वर परिणाम होऊ शकतो. सजीवांचे असंतुलन होऊ शकते.
सर्पदंश औषधांच्या निर्मितीवर परिणाम
ज्या माणसाला साप चावलेला आहे अशा माणसाला दवाखान्यात गेल्यानंतर जे औषध लागते ते विष जिवंत सापाच्या विषापासून तयार केलेले असते. त्यामुळे अशी औषधे तयार करण्यासाठी सापांची आवश्यकता असते. त्यामुळे सापाला न मारता सर्पमित्रांच्या ताब्यात द्यावे. असे आव्हान सर्पमित्र चंद्रकांत ढावरे यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांनी वयाच्या 19 व्या वर्षापासून साप पकडण्यास सुरुवात केली गेल्या दहा वर्षात केम व परिसरातील त्यांनी जवळपास चारशे साप पकडले असल्याचे सांगितले.