डॉक्टर झालेल्या विद्यार्थिनीचा सत्कार करून नगरपरिषद शाळेने दिली कौतुकाची थाप। - Saptahik Sandesh

डॉक्टर झालेल्या विद्यार्थिनीचा सत्कार करून नगरपरिषद शाळेने दिली कौतुकाची थाप।

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा नगर परिषद मुला – मुलींची शाळा क्रमांक चार येथे या शाळेची माजी विद्यार्थीनी डॉ. सानिया शकुर शेख ही BDS परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल तिच्या सत्काराचे दि.१३ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका चंद्रकला टांगडे या होत्या. या शाळेच्या विद्यार्थिनीने उज्वल यश प्राप्त केल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.कुमारी सानिया ही लहानपणापासूनच एक सर्वगुण संपन्न,अष्टपैलू अशी विद्यार्थीनी होती.बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात असे म्हणतात. त्याप्रमाणे सानिया मोठेपणी नक्कीच काहीतरी करून दाखवेल याची मला खात्री होती असे विचार याप्रसंगी तिचे वर्गशिक्षक श्रीयुत मुकुंद मुसळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी डॉ.सानिया आणि तिच्या परिवाराच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षकांचे सत्कार करण्यात आले.सानियाचे वर्गशिक्षक श्रीयुत मुकुंद मुसळे यांचा यावेळी डॉ.सानियाच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी डॉ सानिया हिने ज्या शाळेत आपण प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले त्या शाळेविषयी आणि आपल्या वर्गशिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

आपल्या आजपर्यंतच्या जडणघडणीत मुसळे सरांचे मोलाचे योगदान आहे.माझ्यातील कलागुण ओळखून त्यांना वाव देण्यासाठी दर्जेदार शिक्षण मला मुसळे सर यांनीच दिले.मी या शाळेत प्रवेश घेतला त्यावेळी एक चिखलाचा गोळा होते.त्या चिखलाच्या गोळ्याला योग्य आकार देण्याचे काम या शाळेत घडले.एक सुंदर आणि भव्य इमारत उभी करण्यासाठी पाया भक्कम असावा लागतो.आणि तो पाया मजबूत आणि भक्कम करण्याचे काम मुसळे सर, माने सर आणि दुधे सर तसेच त्यावेळच्या मुख्याध्यापिका सौ.वीर मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले असे विचार डॉ.सानिया हिने सत्काराला उत्तर देताना मांडले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा आदर करावा आणि त्यांच्याकडून दर्जेदार शिक्षण घ्यावेअसे मनोगत तिने व्यक्त केले. शाळेच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका सौ टांगडे मॅडम यांनी आवर्जून सानियाला शाळेत बोलावून तिचा सन्मान करून तिच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्याबद्दल आणि सौ.शगुफ्ता शेख यांनी शाळेच्या सर्व शिक्षकांविषयी आदर व्यक्त केला तर श्री. शकुर शेख यांनी आपल्या मनोगतातून शाळेची देखणी इमारत , रमणीय परिसर , शाळेतील भौतिक सुविधा आणि तळमळीने काम करून शाळेची गुणवत्ता टिकवून ठेवणारा शिक्षक वृंद यामुळे भविष्यातही या शाळेची यशोगाथा अशीच दूरवर पसरत राहणार आहे यात शंका नाही असा विश्वास व्यक्त केला .

हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आसराबाई भोसले यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संतोष माने यांनी केले तर बाळासाहेब दुधे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!