राहुलकुमार चव्हाण यांना राज्यस्तरीय युवा कार्य गौरव पुरस्कार जाहीर
करमाळा(संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील कोर्टीचे सुपुत्र व सध्या पुणे जिल्ह्यातील न्यू इंग्लिश स्कूल खामगाव (ता. मावळ) येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले राहुलकुमार चव्हाण यांना यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय युवा कार्य गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे वितरण आदर्श ग्राम संकल्प महाराष्ट्र राज्याचे प्रमुख पद्मश्री डॉ. पोपटराव पवार व यशवंती आधार सामाजिक संस्थेचे प्रमुख युवा साहित्यिक राजेश दिवटे यांच्या हस्ते येत्या रविवारी दि. 29 ऑक्टोबर रोजी पत्रकार भवन पुणे येथे होणार आहे. याप्रसंगी यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त युवा साहित्यिक राजेश दिवटे लिखित ‘शेतकऱ्यांचा सेवक’ या ग्रंथाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. राहुलकुमार चव्हाण तालुक्यातील प्रसिद्ध व्याख्याते तसेच शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारा पोहचवणारे सेवाभावी शिक्षक म्हणून परिसरात परिचित आहेत. शिक्षक म्हणून कार्यरत असतानाही सामाजिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल तालुक्यातील त्यांच्या मित्र परिवारातून आनंद व्यक्त केला जात आहे.